ब्रिटनच्या एकमेव महिला रॉयल नेव्ही कमांडोचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू; प्रशिक्षण मोहिमेत तिघांनी प्राण गमावले
ब्रिटनच्या रॉयल नेव्हीसाठी अभिमानाचे प्रतीक ठरलेल्या लेफ्टनंट लिली मे फिशर यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. नैऋत्य इंग्लंडमध्ये नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झालेल्या या अपघातात त्यांच्यासह आणखी दोन नौदल जवानांचा मृत्यू झाला. ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने या घटनेची पुष्टी केली आहे. मर्लिन एमके4 हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हा अपघात घडला. 31 वर्षीय लिली-मे फिशर या सध्या कार्यरत असलेल्या ब्रिटनच्या एकमेव महिला रॉयल नेव्ही कमांडो होत्या. त्या हेलिकॉप्टर पायलट म्हणून अंतिम पात्रता चाचणी पूर्ण करत होत्या आणि काही दिवसांतच त्यांना अधिकृत पायलटचा दर्जा मिळणार होता.
फिशर यांनी 2022 मध्ये अत्यंत कठीण समजला जाणारा कमांडो प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला होता. जवळपास 50 किलोमीटरच्या कठोर मार्चसह अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांवर मात करत त्यांनी ग्रीन बेरेट मिळवला होता. त्यामुळे त्या रॉयल नेव्हीच्या सर्वात प्रेरणादायी अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जात होत्या. महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठीही त्या ओळखल्या जात होत्या. सोशल मीडियावर त्यांचे मोठे अनुयायी वर्ग होते. सैन्यातील महिलांना भेडसावणारी आव्हाने, रणांगणावरील अनुभव आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांवर त्या नियमितपणे मते व्यक्त करत असत. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “लिली-मे फिशर यांनी आपल्या धैर्य, समर्पण आणि कर्तृत्वाने असंख्य तरुणांना प्रेरणा दिली. विशेषतः महिलांसाठी त्या आशा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनल्या होत्या.” या दुर्घटनेमुळे ब्रिटिश नौदलावर शोककळा पसरली असून, हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Comments are closed.