इराणच्या सर्वोच्च नेत्यावरील हल्ल्यावेळी मी तिथेच होतो, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितला तो भयावह प्रसंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

याच वर्षी २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या कार्यालयावर ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा आपण तिथेच उपस्थित होतो, असा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी शुक्रवारी केला आहे. हल्ल्यानंतर खामेनी यांच्या स्थितीबाबत आपण अत्यंत घाबरलो होतो. ढिगाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आपल्या मनात पहिला विचार आणि चिंता नेत्याच्या प्रकृतीबाबतच होती, असे ते म्हणाले. या हल्ल्यानंतर १ मार्च रोजी इराणकडून खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली होती. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लेबनॉनमधील अल मयादीन टीव्हीशी बोलताना अरागची यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांवर देखरेख करत असताना त्यांनी खामेनी यांच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेमध्ये दोन दिवस काढले. हल्ल्यापूर्वी खामेनी यांच्यासोबत झालेल्या संवादाची आठवण सांगताना अरागची म्हणाले की, “जोपर्यंत इराणच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जागा मिळत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही निवाऱ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी जाणार नाही. माझ्या लोकांबाबत जे घडेल, तेच माझ्यासोबतही घडेल,” असे खामेनी यांनी स्पष्ट केले होते.

याव्यतिरिक्त अरागची यांनी इशारा दिला आहे की, इराणविरुद्ध अमेरिकन लष्करी तळांचा वापर केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. जर इराणच्या शेजारील देशांमध्ये हे अमेरिकन तळ नसते, तर त्यांच्यावर प्रतिहल्ला झाला नसता. आखाती देशांच्या सरकारांनी त्यांच्या जमिनीचा अमेरिकन लष्कराकडून अशा प्रकारे वापर करण्याला विरोध केला होता. परंतु वॉशिंग्टनने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. इराणने दिलेल्या प्रत्युत्तराने अमेरिका आणि त्यांचा मित्र देश इस्रायलला धक्का बसला. इराणकडून इतक्या तत्काळ आणि जोरदार कारवाईची कोणालाही अपेक्षा नव्हती, असेही अरागची म्हणाले.

अरागची यांनी सध्याचे सर्वोच्च नेते सय्यद मोजतबा खामेनी यांचे कौतुक करताना सांगितले की, ते देशाच्या विद्यमान घडामोडींमध्ये अत्यंत प्रभावी आणि मजबूत भूमिका बजावत आहेत आणि सत्तेची सूत्रे पूर्णपणे त्यांच्या हातात आहेत.

Comments are closed.