Ratnagiri News – पाळंदे किनाऱ्यावर सापडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी अडचणीत सापडलेल्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाला वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक प्राणीमित्रांच्या संयुक्त प्रयत्नांतून अखेर जीवदान मिळाले आहे. तीन दिवस उपचार आणि विशेष देखरेखीनंतर या कासवाला गुरुवारी बोटीच्या सहाय्याने समुद्रातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

1 जून रोजी पाळंदे गावातील ग्रामस्थ अनिल आरेकर यांनी समुद्रकिनाऱ्यावर एक ऑलिव्ह रिडले कासव पाण्याबाहेर आल्याची माहिती वनविभागाला दिली होती. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान हे कासव अशक्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी कासवाला ताब्यात घेत पुढील उपचार प्रक्रिया सुरू केली. या घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी, कांदळवन कोकण दक्षिण रायगड-अलिबाग यांच्या कांचन पवार तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कासवावर उपचार सुरू करण्यात आले.

हर्णे येथील प्राणिमित्र तसेच कांदळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फाहाज जमादार यांच्या विशेष खाऱ्या पाण्याच्या टँकमध्ये या कासवाला ठेवण्यात आले. सलग तीन दिवस त्याची काळजी घेण्यात आली. उपचारादरम्यान कासवाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सकाळी वनविभागाच्या उपस्थितीत बोटीच्या सहाय्याने कासवाला समुद्रात नेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात वनविभाग, प्राणिमित्र आणि स्थानिक स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी आंजर्ले कांदळवन वनरक्षक प्रभू साबणे, दाभोळ कांदळवन वनरक्षक विश्वंभर झाडे, मँग्रोव्ह फाउंडेशनचे सहाय्यक उपजीविका तज्ज्ञ अभिनय केळसकर तसेच कांदळवन सहव्यवस्थापन समिती हर्णेचे अध्यक्ष फाहाज जमादार उपस्थित होते.

पाळंदे किनाऱ्यावर सापडलेल्या या दुर्मिळ कासवाला वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून वन्यजीव संवर्धनासाठी नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवांची संरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची प्रजाती मानली जाते. समुद्रातील प्रदूषण, प्लास्टिक कचरा, मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकणे आणि हवामान बदल यांसारख्या कारणांमुळे या प्रजातीसमोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. त्यामुळे अशा जीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नमूद केले आहे. समुद्रकिनारी किंवा परिसरात कोणताही समुद्री प्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ८६९३० ३४८०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वनाधिकारी (कांदळवन कक्ष, रत्नागिरी) किरण ठाकूर यांनी केले आहे.

Comments are closed.