IND vs AFG: 16 वर्षे आणि 69 सामन्यांनंतर असे घडणार; या दोन दिग्गजांशिवाय भारत मायदेशात खेळणार कसोटी सामना!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज, शनिवार, 6 जून रोजी मुल्लानपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. हा सामना सकाळी 9.30 वाजता (IST) सुरू होईल. दोन्ही संघांचे कर्णधार अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी 9.00 वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही केवळ दुसरी कसोटी आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2018 मध्ये त्यांच्याविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात युवा खेळाडूंचा समावेश असलेला संघ मैदानात उतरेल आणि काही खेळाडूंना पदार्पणाची संधीही मिळू शकते. भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

16 वर्षांनंतर अश्विन आणि जडेजा यांच्याशिवाय मायदेशात कसोटी सामना

रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाला अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. परिणामी, 16 वर्षे आणि 69 कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, भारतीय संघ ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये अश्विन किंवा जडेजा यांपैकी कोणाचाही समावेश नसताना मायदेशात कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी अशी घटना नोव्हेंबर 2010 मध्ये घडली होती.

सामन्याच्या आदल्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघाच्या आगामी तयारीसाठी या कसोटीचे महत्त्व अधोरेखित केले. श्रीलंकेचा आगामी दौरा लक्षात घेता, गंभीर ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्याचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यासोबत हर्ष दुबेलाही आज पदार्पणाची संधी मिळू शकते. रणजी ट्रॉफीच्या एकाच हंगामात सर्वाधिक बळी (69) घेण्याचा विक्रम दुबेच्या नावावर आहे.

गौतम गंभीरने हे देखील नमूद केले की, साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळालेली नाही, संघाला त्याला योग्य संधी द्यायची आहे. सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही फलंदाजीद्वारे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत तो वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार शुबमन गिल यांच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर होता.

भारताची संभाव्य इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्ष दुबे, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Comments are closed.