श्रेयस अय्यरच्या हाती टी-20 संघाची कमान; वैभव सूर्यवंशीसह 'या' खेळाडूंचे भाग्य उजळले

बीसीसीआयने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली आहे. संघ जाहीर करताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेत श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे. यामुळे श्रेयस अय्यर भारताच्या टी-20 इतिहासातील 15वा कर्णधार ठरणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. मात्र, अलीकडील काळातील खराब फलंदाजीच्या कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला या मालिकेसाठी संघातही स्थान देण्यात आलेले नाही.

दरम्यान, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे नशीब खुलले असून त्याला प्रथमच भारताच्या वरिष्ठ टी-20 संघात संधी मिळाली आहे. तसेच तिलक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या संघातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव. दोघांनाही प्रथमच भारताच्या वरिष्ठ टी-20 संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2026 मधील प्रभावी कामगिरीचे फळ प्रिन्स यादवला मिळाले असून त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आगामी 2027 विश्वचषक आणि कसोटी क्रिकेटचा विचार करून या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला टी-20 संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार)
अभिषेक शर्मा
संजू सॅमसन
ईशान किशन
शिवम दुबे
तिलक वर्मा (उपकर्णधार)
नितीशकुमार रेड्डी
अक्षर पटेल
वॉशिंग्टन सुंदर
वरुण चक्रवर्ती
रवी बिश्नोई
मोहम्मद सिराज
हर्षित राणा
अर्शदीप सिंग
राजकुमार यादव
वैभव सूर्यवंशी

Comments are closed.