Chandrapur news – ‘कॅन्सर केअर फाउंडेशन’वर सायबर हल्ला; डिजिटल यंत्रणा ठप्प करून खंडणीची मागितली
चंद्रपूर येथील नामांकित ‘कॅन्सर केअर फाउंडेशन’ (कॅन्सर हॉस्पिटल)च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ‘रॅन्समवेअर’ हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय डेटा लॉक केला असून, तो पूर्ववत करण्यासाठी १.२३४५६ बिटकॉईन म्हणजेच लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. या सायबर विळख्यामुळे चंद्रपूरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सकाळी रुग्णालयाचे कामकाज सुरू होत असताना आयटी विभागाला मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने तपासणी केली असता, सर्व्हरवर हॅकर्सनी पाठवलेला धमकीचा संदेश स्क्रीनवर झळकला. अज्ञात हॅकर्सनी रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा हायजॅक केल्याचे यामुळे स्पष्ट झाले.
दरम्यान, या हल्ल्यामुळे रुग्णालयाची ‘हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या शेकडो रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चालू उपचारांची माहिती, तपासणी अहवाल आणि प्रशासकीय नोंदी कुलूपबंद झाल्या आहेत. खंडणीची रक्कम न दिल्यास हा संपूर्ण डेटा कायमचा नष्ट करण्याची धमकी हॅकर्सनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलचे तज्ज्ञ आता सर्व्हर पूर्ववत करण्यासाठी आणि हॅकर्सचा सुगावा लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही काळापासून संवेदनशील संस्थांवर रॅन्समवेअर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या अतिशय खाजगी माहितीचा गैरवापर होण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. या घटनेमुळे आता चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.