रंगयात्रा- झोपलेली जिप्सी
<<दुष्यंत पाटील>>
हेन्री रुसो यानं काढलेलं ‘द स्लीपिंग जिप्सी’ हे विश्वविख्यात चित्र! अंतःप्रेरणेने काढलेल्या या चित्रशैलीला कलेच्या दुनियेत ‘नाईव्ह आर्ट’ किंवा ‘प्रिमिटिव्हिझम’ असं म्हणतात.
एखाद्या व्यक्तीचं चित्रकलेत शिक्षण झालं नसेल, तसंच तिला प्रमाणबद्ध चित्रं काढता येत नसतील, तर अशी व्यक्ती चित्रकार बनू शकेल का? या व्यक्तीनं काढलेली चित्रं अक्षरशः लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी दिसत असतील, तर अशी चित्रं जगप्रसिद्ध होऊ शकतील का? हेन्री रुसो यानं काढलेलं ‘द स्लीपिंग जिप्सी’ हे अशाच प्रकारात मोडणारं विश्वविख्यात चित्र!
रुसोनं लहानपणी कलेचं रीतसर शिक्षण घेतलेलं नव्हतं किंवा नंतरच्या काळात त्यानं मोठय़ा आर्ट अकॅडमीमध्येही शिक्षण घेतलेलं नव्हतं. खरे तर त्याचा जन्म 1844 मध्ये फ्रान्समधल्या एका साध्या कुटुंबात झाला होता. पोट भरण्यासाठी त्यानं आयुष्याची बरीच वर्षे पॅरिसच्या जकात नाक्यावर एक साधा कारकून म्हणून काम केलं.
रुसोला वयाच्या चाळीशीनंतर चित्रकलेचा छंद जडला. त्यानं कसल्याही शिक्षणाशिवाय स्वतच्या कल्पनेनं चित्रं काढायला सुरुवात केली. दिवसभर सरकारी फाईल्स बघायच्या, टॅक्स वसूल करायचा आणि संध्याकाळी घरी आल्यावर रंगांशी खेळायचं, असा रुसोचा दिनक्रम होता. जेव्हा त्यानं वयाच्या 49 व्या वर्षी आपली सरकारी नोकरी सोडली, तेव्हा कुठे तो पूर्णवेळ चित्रकार बनला. प्रमाणबद्ध चित्रं काढता येत नसली तरी रुसोचा स्वतवर अचाट विश्वास होता. तो अतिशय निष्पाप आणि सच्च्या मनाचा माणूस होता. त्याच्या या साध्या शैलीला कलेच्या दुनियेत ‘नाईव्ह आर्ट’ किंवा ‘प्रिमिटिव्हिझम’ असं म्हणतात.
‘द स्लीपिंग जिप्सी’ हे चित्र रुसोनं 1897 मध्ये काढलं. हे चित्र काढण्याचं काम त्याला कुणीही सांगितलेलं नव्हतं. त्यानं हे चित्र निव्वळ अंतःप्रेरणेनं काढलं.
आपण चित्रावर नजर टाकली तर सर्वप्रथम चित्राच्या मध्यभागी असलेला सिंह आपलं लक्ष वेधून घेतो. हा गडद तपकिरी रंगाचा सिंह संपूर्ण चित्रात सर्वात मोठा आणि शक्तिशाली भाग आहे. सिंहाच्या नजरेचा रोख खाली झोपलेल्या स्त्राrकडे आहे. त्यामुळे आपली नजर आपोआप सिंहावरून त्या जिप्सी स्त्राrच्या रंगीबेरंगी कपडय़ांवर पडते. मग त्या स्त्राrच्या शेजारी असलेल्या मँडोलिन (एक प्रकारचे तंतूवाद्य) आणि मातीच्या घडय़ावर आपली नजर खिळते. ती स्त्राr दूरवरून चालत आलेली एक कलाकार आहे, हे आपल्याला नकळत समजतं. चित्रात पार्श्वभूमीला वाळवंट दाखवलंय. सर्वात शेवटी आपली नजर उजव्या कोपऱयात वर चमकणाऱया पूर्ण चंद्रावर जाते. हा चंद्र संपूर्ण चित्राला एक शांत, दुधाळ प्रकाश देतोय.
चित्रकारानं या चित्रात प्रतीकं वापरलेत. जिप्सी म्हणजे अशी जमात जी कधीच एका ठिकाणी राहत नाही, जी सतत भटकत असते. ही जिप्सी स्त्राr म्हणजे कलेचं, सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. तिची गाढ झोप दाखवते की, तिला बाह्य जगाची, तिथल्या संकटांची कोणतीही भीती नाही. ती स्वतच्या कलेवर (वाद्यावर) आणि निसर्गावर पूर्ण विश्वास ठेवून निर्धास्त झोपली आहे. सिंह हा जंगलाचा राजा, क्रूरतेचं प्रतीक. तो वाळवंटात या स्त्राrच्या इतक्या जवळ आला आहे की, त्याचा श्वास तिला जाणवू शकतो. पण त्याचा तिच्यावर हल्ला करण्याचा इरादा दिसत नाही. तो फक्त कुतूहलाने पाहतोय.
स्त्राrच्या उशाशी एक मँडोलिन आणि पाण्याचा घडा आहे. ते सुचवतं की, जगण्यासाठी माणसाला खूप मोठय़ा बंगल्याची किंवा गाडय़ांची गरज नसते. एक वाद्य (कला) आणि थोडं पाणी (जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टी) एवढं असेल, तर माणूस वाळवंटातही सुखानं झोपू शकतो. चित्रातलं आकाश हे नेहमीच्या रात्रीसारखं काळंकुट्ट नाही, तर ते एका सुंदर निळ्या रंगाचं आहे. चंद्र अगदी स्पष्ट, पांढराशुभ्र आहे. हा चंद्र म्हणजे या संपूर्ण दृश्याचा ‘दिग्दर्शक’ आहे. तो या जागेवर एक जादुई जादूची कांडी फिरवतोय, ज्यामुळे सिंह आणि स्त्राr दोघेही एका संमोहनात अडकल्यासारखे वाटतात.
चित्र पूर्ण झाल्यावर रुसोनं ते त्याच्या शहराच्या महापौरांना विकण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं त्या काळच्या महापौरांना आणि कमिटीला या चित्राचं महत्त्व कळलं नाही व त्यांनी ते खरेदी करण्यास नकार दिला. त्यांना वाटलं की, हे चित्र खूपच विचित्र आणि बालिश आहे. आज हे चित्र अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील अत्यंत मानाच्या ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये आहे. आज हे चित्र तिथल्या सर्वात सुरक्षित आणि बुलेटप्रूफ काचेच्या मागे ठेवलेलं आहे. जर आज या चित्राचा लिलाव झाला, तर त्याची किंमत शेकडो कोटी रुपयांच्या घरात जाईल असं जाणकारांना वाटतं! ज्या चित्रकाराला जिवंतपणी लोकांनी ‘बालिश’ म्हणून हिणवलं, त्याच्या एका चित्रासाठी आज जगभरातून लाखो लोक न्यूयॉर्कला येतात.
(लेखक कलासमीक्षक आहेत.)
Comments are closed.