अचानक – वेदांताच्या हिंदुत्वाचा पराभव झाला!

‘वेदांता’ समूहाच्या अनिल अग्रवाल यांच्यावरील ‘ईडी’च्या धाडी धक्कादायक आहेत. अग्रवाल हे नरेंद्र मोदी यांना देवस्वरूप मानत. कार्पोरेट क्षेत्रातील ख्यातनाम अंधभक्त, मोदी-शहांपेक्षा प्रखर हिंदुत्ववादी असे हे अग्रवाल. त्यांनी असा काय गुन्हा केला? अग्रवाल यांनी बेइमानीशी टक्कर घेण्याचा प्रयत्न केला. त्यात हिंदुत्व पराभूत झाले.

भारतात उद्योगधंदा करावा असे चांगले वातावरण राहिलेले नाही. पंतप्रधान मोदी यांचा कालखंड हा ‘अमृतकाल’ असल्याचे सांगितले जाते. मात्र आर्थिक आणि औद्योगिक आघाडीवर देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मोदींच्या अमृत कालात किमान दहा हजार मध्यम व मोठे उद्योगपती देश सोडून गेले. हे लक्षण चांगले नाही. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ भारतात व्यापार करण्यासाठी आली. व्यापार करताना त्यांनी देशही ताब्यात घेतला. ‘स्टेट कॅप्चर’चा प्रकार तेव्हा घडला, तो आजही घडताना दिसत आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळी जे उद्योगाचे वातावरण भारतात होते, तेवढेही आज दिसत नाही. त्याच काळात टाटा, पुढे बिर्ला, बजाज, किर्लोस्कर वगैरे उद्योग चांगले अर्थार्जन करीत होते. महात्मा फुले हे इंग्रज काळात ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची कामे करणारी कंपनी चालवत व त्यांची उलाढाल ‘टाटा’पेक्षा जास्त होती. आजच्या अमृत कालात पंतप्रधान मोदी सांगतील त्यांनीच उद्योग करायचा व त्यांनीच नफा कमवायचा, हे असे धोरण ठरले असेल तर उद्योजक सरळ देशाबाहेर गाशा गुंडाळून जातील व या पद्धतीने लोक आता बाहेरही पडत आहेत. हे सर्व मी का लिहीत आहे, तर वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या उद्योगांवर पडत असलेल्या ‘ईडी’च्या धाडींमुळे देशभरात खळबळ माजली आहे. अनिल अग्रवाल हे काही कुणी टिनपाट उद्योगपती नाहीत. जगभरात प्रतिष्ठा पावलेले भारतीय उद्योगपती आहेत. साधारण दीड लाख कोटींचे त्यांचे उद्योग साम्राज्य त्यांनी मेहनतीने उभे केले आहे. ते बऱ्याच अंशी प्रामाणिक आहेत. मग अचानक त्यांच्यावर धाडी का पडू लागल्या? त्यांच्यावर एकापाठोपाठ गुन्हे दाखल का होत आहेत? मोदींचेच अंधभक्त असलेल्या अनिल अग्रवाल यांचे काय चुकले? याचे उत्तर एकाच वाक्यात द्यायचे तर अनिल अग्रवाल यांनी गौतम अदानी यांच्या बेइमानीला आव्हान दिले. अग्रवाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या ‘सब कुछ अदानी’ या भूमिकेशी टक्कर घेण्याचा प्रयत्न केला. परिणाम? ‘ईडी’ व इतर तपास यंत्रणांनी त्यांच्या उद्योगात घुसून दहशत निर्माण केली. उत्तर प्रदेशातील प्रख्यात ‘जेपी’ उद्योगसमूह कोसळला व सरकारी बँकांची थकबाकी वाढली तेव्हा त्यांच्या संपत्तीचा लिलाव बँकांनी सुरू केला. अनिल अग्रवाल कायदेशीर मार्गाने या प्रक्रियेत उतरले. अग्रवाल यांच्यातर्फे 17 हजार कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली गेली. या स्पर्धेत ‘अदानी’ होते. त्यांच्यातर्फे 14 हजार कोटींची बोली लावली. कायद्याने अग्रवाल यांची बोली तीन हजार कोटी जास्त असल्याने अग्रवाल हे लिलाव जिंकल्याचे त्यांना कळविण्यात आले, पण पंधरा दिवसांनी अनिल अग्रवाल यांना “माफ करा, तुम्हाला ‘जेपी’च्या कंपन्यांचा ताबा देता येणार नाही. या कंपन्या गौतम अदानी यांना हव्या आहेत,” असे उत्तर देऊन त्यांचा हक्क डावलला गेला.

अनिल अग्रवाल यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न होता. अग्रवाल हे सरळ सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात त्यांना न्याय मिळाला नाही. ते मागे हटले नाहीत तेव्हा त्यांच्यावर ‘वृक्षतोड’ वगैरे कारणांचे गुन्हे नोंदवले व आता त्यांच्या कंपन्यांवर ‘ईडी’ने धाडी सुरू केल्या.

या धाडींचा अर्थ काय? अदानी व मोदी एकच आहेत. (जसे राहुल गांधी नेहमी सांगतात, राज्य व संपत्ती अदानींची आहे. मोदी त्यांचे राखणदार आहेत.)

पाटणा, मुंबई, इंग्लंड

आता ‘वेदांता’च्या अनिल अग्रवाल यांच्याविषयी समजून घेऊ.

  • त्यांनी शून्यातून आपले औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.
  • पाटणा, मुंबई आणि इंग्लंड हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
  • अग्रवाल हे मोदी व संघापेक्षा जास्त कडवट हिंदुत्ववादी आहेत. श्रीरामजन्म मंदिर प्रतिष्ठापनेच्या वेळी ते कपाळास चंदन वगैरे कोरून हजर होते.
  • मी त्यांची एक मुलाखत पाहिली. लंडनमधील त्यांच्या आलिशान घरात बसून ते अत्यंत विनम्रपणे वैदिक धर्म, सनातन हिंदुत्व, श्रीकृष्ण, श्रीराम, गीता यांवर भाष्य करीत होते. त्यांनी इंग्लंडमध्ये हिंदू-वैदिक विचारांना प्राधान्य देणाऱ्या शाळा उभ्या केल्या. हिंदुत्वाचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी मोठे दान दिले. लंडनमध्येही ते रोज सकाळी नित्यनेमाने मंदिरात जातात. अग्रवाल म्हणाले, “मोदी यांच्यामुळे भारतीयांना जगात प्रतिष्ठा व मान मिळू लागला. मोदी हे महान आहेत. मोदींमुळे आमची छाती गर्वाने फुलते.”
  • ‘मोदी यांचे पक्के अंधभक्त’ अशी अग्रवाल यांची कार्पोरेट क्षेत्रात ख्याती होती. मोदी हे देवाचे रूप असल्याची आरतीही अनिल अग्रवाल यांनी केली. भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 226 कोटी रुपयांचे दान त्यांनी दिले. त्या बदल्यात भगवान मोदी यांनी आता अग्रवाल यांना विषाचा प्याला दिला आहे. ‘जेपी’ (Jay Pee) प्रकरणात अदानींविरुद्ध कोर्टात गेल्याने अग्रवाल यांना त्यांच्या देवाने सुळावर चढविण्याचे ठरवले. आता अंधभक्त अग्रवाल काय करणार? अदानींविरुद्धचे खटले मागे घेऊन बेइमानीचे समर्थन ते करतील हे नक्की. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय दिसत नाही. अदानी यांच्या बेइमानीविरुद्ध पंगा घेऊन अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिले. त्यामुळे ‘देव’ चिडला. त्यामुळे अग्रवाल यांचे हिंदुत्व, भाजपला केलेली मदत, मोदींची भक्ती गेली चुलीत.

घृणास्पद स्पर्धा

भारतीय उद्योग जगतात ही अशी ‘अदानी ब्रॅण्ड’ची घृणास्पद स्पर्धा याआधी कधीच झाली नव्हती. मनमोहन सिंग व नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय बाजार ‘मुक्त’ केला तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेला बहार आली, परंतु मोदी काळात वेगळेच काहीतरी घडत आहे. मोदी सत्तेवर यावेत यासाठी सुरुवातीच्या काळात साथ दिलेल्या जवळपास सगळ्यांनाच मोदींनी धक्क्याला लावले आहे, पण उद्योगपतींचा काटा काढण्यासाठी ‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर व्हावा हे दुर्दैव आहे! ईडी हे केवळ अदानी यांना हवी ती संपत्ती ताब्यात घेण्याचे साधन नाही, तर कोर्टाबाहेर समझोता घडवून आणण्याचेही हत्यार बनले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा रेड्डीकडून (जीव्हीके) घेताना ‘ईडी’ने हेच तंत्र वापरले. लोक आता विचारत आहेत, वेदांता ग्रुपवर अशाच पद्धतीने अदानी कधी ताबा मिळवणार? चेन्नईची Coastal Energen ही 1200 MW कोल बेस्ड थर्मल पॉवर कंपनी ‘ईडी’च्या मदतीने ताब्यात घेण्याचे काम अदानी यांनी केले. कंपनी आर्थिक अडचणीत आणली. SBI ने Insolvency प्रोसेस सुरू केली. कंपनीचे मालक अहमद बुहारी यांच्याविरुद्ध मनी लॉण्डरिंग खटला दाखल केला गेला. बुहारी यांना अटक केली. ते 31 महिने तुरुंगात होते. या काळात अदानी यांनी बुहारी यांची कंपनी ताब्यात घेतली. कंपनी पूर्णपणे अदानींच्या ताब्यात आल्यावरच अहमद बुहारी यांना जामीन मिळाला. आता चेन्नई  (PMLA) कोर्टाने बुहारी यांना जवळ जवळ निर्दोष मुक्त केले. मनी लॉण्डरिंगचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, पण त्यांची कंपनी अदानींकडे आधीच गेली. भारतीय भूमीत अशा प्रकारे उद्योग कोणीच केला नाही. त्यामुळे अदानी हे जगातले श्रीमंत उद्योगपती बनले तरी त्यांना तो मान आणि प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. पैसे तर दाऊद इब्राहीमकडेही आहेत, असे लोक थट्टेने सांगतात. गौतम अदानी यांना धारावीसह संपूर्ण मुंबई ताब्यात घेऊन विकायची आहे. त्यामुळे जे विरोध करतील त्यांच्यावरही ‘ईडी’चा हल्ला केला जाईल. देश एका भयंकर वळणावर उभा आहे. हे वळण घसरणीचे आहे. विजय माल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नितीन संदेसरा या सगळ्यांवर ‘ईडी’ने फास आवळला तो त्यांनी बँकांची कर्जे बुडवल्यामुळे. बँकांचे नुकसान हे राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान, पण ‘वेदांता’च्या अनिल अग्रवाल प्रकरणात बँकांचा तीन हजार कोटींचा फायदा होत असताना ‘ईडी’ने अनिल अग्रवाल यांच्यावर धाडी घातल्या.

बँकांचे नुकसान करणाऱ्या ‘अदानीं’साठी मोदी यांच्या नियंत्रणाखालील तपास यंत्रणा काम करीत आहेत.

‘वेदांता’चा हिंदुत्ववाद येथे पराभूत झाला!

Comments are closed.