वायनाड येथील शाळेत 150 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
उलट्या-तापाने 38 मुले रुग्णालयात दाखल
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाड जिह्यातील कोयलाडी येथील एका अनुदानित उच्च प्राथमिक शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांवर गेल्या तीन दिवसांपासून ताप आणि उलट्यांसाठी उपचार सुरू आहेत. हे विद्यार्थी मार बासेलियस अनुदानित उच्च प्राथमिक शाळेचे असून त्यापैकी 38 जणांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना बाथेरी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांच्या शारीरिक त्रासाचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. आजाराचे कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलांच्या आजारपणाबाबत तूर्तास काळजी करण्याचे कारण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुलांवर उपचार करण्यासाठी बाथेरी तालुका रुग्णालयात एक विशेष वॉर्ड स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.