गिलगिट-बाल्टिस्तानमधील निवडणुकांमुळे भारत संतप्त झाला आहे.
पाकिस्तानची कृती अस्वीकार्य असल्याचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 7 जून रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तीव्र विरोध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका निवेदनात याबाबत नाराजी वर्तविण्यात आली. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या प्रदेशात निवडणुका घेण्याची त्यांची योजना पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे भारतीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्यामुळे पाकिस्तानला त्या भागात कोणतीही राजकीय प्रक्रिया राबवण्याचा अधिकार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या निवडणुका घेण्यासारख्या कृतींमुळे जमिनीवरील वास्तव बदलू शकत नाही, असेही भारताचे मत आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या ताब्यातील भागातील लोकांना दीर्घकाळापासून मानवाधिकार उल्लंघन, राजकीय दडपशाही, आर्थिक शोषण आणि मूलभूत स्वातंत्र्याचा अभाव यांचा सामना करावा लागत आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये रविवार, 7 जून रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 जिह्यांमधील 24 सार्वत्रिक जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून विविध राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान पाकिस्तानच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असला तरी भारत त्याला आपल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा भाग मानतो. याच कारणामुळे, भारत सहसा तेथील कोणत्याही निवडणुकीला किंवा राजकीय हालचालींना विरोध करतो. त्यामुळेच आताही येथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या अशा कृतींमुळे त्यांच्या बेकायदेशीर ताब्याला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही, असे भारताने ठणकावले आहे.
Comments are closed.