कापून टाका किंवा जाळून टाका…
स्वयंपाक करताना किंवा अन्य काही काम करताना बोट थोडेसे जरी कापले गेले, तरी ज्या यातना होतात, त्यांचा अनुभव बहुतेकांनी घेतलेला आहे. भाजल्यानंतर तर कापल्यापेक्षाही अधिक यातना होतात. तथापि, पृथ्वीवर एक सस्तन जीव असा आहे, की ज्याला कापले किंवा जाळले तरी मुळीच यातना होत नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या जीवाचे नाव ‘नेकेड मोल रॅट’ असे असून तो उंदरांच्या कुळातील प्राणी आहे. हा सस्तन प्राणी बिनकेसांच्या उंदरांसारखा दिसतो. तो छोट्या आकाराचा आहे. तो भूमीच्या खाली वास्तव्य करतो. त्याच्या मज्जासंस्थेची रचना अशी आहे, की त्याला यातनाच होत नाहीत.
कोणत्याही सस्तन सजीवांच्या मज्जासंस्थेत विशेष रासायनिक पदार्थ असतात. त्यांना ‘न्यूरोट्रान्स्मीटरर्स‘ असे शास्त्रीय नाव आहे. आपल्या शरीराच्या संदर्भात अशी कोणतीही घटना घडली की जेणेकरुन शरीराच्या कोणत्याही अवयवाला त्रास होईल, त्यावेळी हे न्यूरोट्रन्स्मीटर्स’ कामाला लागतात आणि मेंदूला त्वरीत संदेश देतात. मेंदूतून या संदेशाचे परावर्तन त्या विशिष्ट अवयवाकडे होते आणि आपल्याला यातना किंवा वेदना होऊ लागतात. मार लागणे, भाजणे किंवा कापणे अशा घटनांमध्ये आपल्याला यामुळेच यातना होतात. शरीराच्या आतल्या भागात काही समस्या निर्माण झाली असेल, तरीही असे संदेशवहन होते आणि त्या शरीराच्या विशिष्ट भागात वेदना होऊ लागतात. या वेदना होत असल्याने आपण त्वरित समस्यांवर उपाययोजना करतो आणि वेदनांचे कारण दूर करतो. आपल्या मज्जासंस्थेतील ही व्यवस्था आपले अशा समस्यांपासून संरक्षण करते. मात्र या जीवामध्ये ‘न्यूरोट्रान्स्मीटर्स’चा पूर्णपणे अभाव आहे. ही व्यवस्थाच त्याच्या शरीरात नाही. त्यामुळे त्याला काहीही झाले तरी यातना होतच नाहीत. हा जीव आगीत पडला किंवा चिरला गेला, तरीही त्याला त्याची जाणीवही होत नाही, असे संशोधक स्पष्ट करतात. अशी शरीर रचना असणारा हा जगातला आतापय्त ज्ञात असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे, असे मानले जाते. यातनांची जाणीव करुन देणारी यंत्रणा त्याच्या शरीरात नसली, तरी धोक्याची जाणीव त्याला स्पर्शाने होते.
Comments are closed.