INDvsAFG: मानव सुथारचे स्वप्नवत पदार्पण! 25 वर्षांनंतर भारतीय कसोटी क्रिकेटला मिळाला नवा विक्रमवीर

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना न्यू चंदीगडच्या मुल्लाणपूरमध्ये खेळला जात आहे. महाराचा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारपासून (6 जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताकडून मानव सुथारचे पदार्पण झाले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात विकेट्स घेण्याची कामगिरी करत एका खास यादीत प्रवेश केला आहे.
दुसऱ्या दिवशी (7 जून) चहापानाच्या थोड्या वेळा आधीच कर्णधार शुबमन गिलने सुथारला चेंडू दिला. त्याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये विकेट घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने अब्दुल मलिकला बाद केले. मलिक स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नांत असताना चेंडू बॅटची कड घेऊन स्क्वेयर लेगवर उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने तो उत्तमरित्या झेलला.

सुथार कसोटी कारकिर्दीच्या पहिल्याच षटकात विकेट घेणारा केवळ आठवाच भारतीय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने अशा यादीत स्थान मिळवले आहे, जी जवळपास आठ दशकांपूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ सात इतर नावांचा त्यात समावेश आहे.

या विशेष यादीत मोंटू बॅनर्जी (विरुद्ध वेस्ट इंडिज, 1948), मनोहर हार्डिकर (विरुद्ध वेस्ट इंडिज,1958),
वामन कुमार (विरुद्ध पाकिस्तान, 1961), चेतन शर्मा (विरुद्ध पाकिस्तान, 1984), डब्ल्यूव्ही रमन (विरुद्ध वेस्ट इंडिज, 1988), निलेश कुलकर्णी (विरुद्ध श्रीलंका, 1997) आणि टिनू योहानन (विरुद्ध इंग्लंड, 2001) यांचा समावेश आहे.

सुथारची कामगिरी खास कारण 2001 मध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण करणाऱ्या योहानन यांनी मार्कस ट्रेस्कोथिकला पहिल्याच षटकात बाद केल्यापासून 25 वर्षात कोणत्याही भारतीयाने अशी कामगिरी केली नव्हती. तो 2021 मध्ये अक्षर पटेलने पदार्पण केल्यापासून भारताचा पहिला स्पेशल फिरकी गोलंदाज आहे.

स्वप्नवत पदार्पण!
(पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेणारे भारतीय खेळाडू)

मोंटू बॅनर्जी विरुद्ध वेस्ट इंडिज, 1948
मनोहर हार्डिकर विरुद्ध वेस्ट इंडिज,1958
वामन कुमार विरुद्ध पाकिस्तान, 1961
चेतन शर्मा विरुद्ध पाकिस्तान, 1984
डब्ल्यूव्ही रमन विरुद्ध वेस्ट इंडिज, 1988
निलेश कुलकर्णी विरुद्ध श्रीलंका, 1997
टिनू योहानन विरुद्ध इंग्लंड, 2001
*मानव सुथार विरुद्ध अफगाणिस्तान, 2026

Comments are closed.