उद्घाटनापूर्वीच नगर परिषद अभ्यासिकेत आग; शिवसेना संतप्त, १००% काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत अशा सार्वजनिक वास्तूंचे लोकार्पण करणे चुकीचे

स्थानिक नगर परिषद संचलित अभ्यासिकेच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच येथे अत्यंत धक्कादायक प्रकार आणि सावळागोंधळ समोर आला आहे. काल रात्रीच्या सुमारास येथील विद्युत मीटरला अचानक लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग वेळीच विझवण्यात आली आणि एक मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी तातडीने अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली आणि निष्काळजी प्रशासनाला संतप्त होत तीव्र शब्दांत धारेवर धरले.

या अभ्यासिकेमध्ये ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी कुटुंबातील अनेक गरजू विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासासाठी येत असतात. सोमवार, ८ जून रोजी या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परंतु, उद्घाटनाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच शनिवारी रात्री पावणे आठ ते आठच्या सुमारास मुख्य विद्युत मीटरला अचानक आग लागली. अभ्यासिका सुरू असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, तेथे अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवत ही आग नियंत्रणात आणली, अन्यथा या ठिकाणी मोठा जीवितहानीचा प्रसंग ओढवला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन संपूर्ण अभ्यासिकेची आणि स्वच्छता गृहांची पाहणी केली असता, तेथील दुरवस्था पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना किशोर गारोळे म्हणाले, ‘जोपर्यंत कंत्राटदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे १००% काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत अशा सार्वजनिक वास्तूंचे लोकार्पण करणे चुकीचे आहे. दोन दिवस उद्घाटन उशिरा झाले तरी चालेल, पण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून घाईघाईने लोकार्पण उरकणे योग्य नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः येथे येऊन कामाची पडताळणी करायला हवी होती.’

पाहणी दरम्यान खालील गंभीर त्रुटी आणि गैरसोयी समोर आल्या आहेत.विद्युत व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची असून मीटरला आग लागल्याने संपूर्ण वायरिंगच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असून तेथून प्रचंड दुर्गंधी येत आहे. तसेच हवा बाहेर जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅन देखील लावण्यात आलेले नाहीत.

अभ्यासिकेत बसवलेले कुलर्स व्यवस्थित काम करत नसून, कडक उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी येथे तात्काळ एसी (AC) लावण्याची गरज आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या वॉटर फिल्टरमध्ये (Water Filter) थेट विद्युत प्रवाह (Current) उतरत असल्याचे आढळून आले आहे, जे विद्यार्थ्यांच्या जिवासाठी अत्यंत घातक आहे.

या सर्व समस्यांबाबत अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी किशोर गारोळे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे व तक्रारींचे निवेदन सोपवले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत गारोळे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, ‘लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आम्ही स्वतः या विषयात वैयक्तिक लक्ष घालू. येत्या १० ते १५ दिवसांच्या आत निकृष्ट दर्जाचे वॉटर फिल्टर बदलून चांगल्या दर्जाची व्यवस्था करणे, एसी बसवणे आणि इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील’. आता उद्घाटनानंतर प्रशासन या गंभीर त्रुटींवर किती लवकर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासोबत शिवसेना नगरसेवक महेश रिंढे, नितीन तुपे, निसार अन्सारी सह विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.