कोल्हापूरात मान्सूनपूर्व पावसाने केली महानगरपालिकेच्या ढिसाळ कामाची पोलखोल, नागरिकांच्या घरात शिरले सांडपाणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या दोन तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी रात्री धुवांधार कोसळलेल्या पावसामुळे गटार, नाले ओव्हरफ्लो झाले. महानगरपालिकेच्या ढिसाळ कामांमुळे ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट नागरिकांच्या घरी शिरल्याचे दिसून आले. रस्त्यावर रस्ते बांधणे भोवले असून अमृत दोन योजनेचाही फटका बसल्याचे दिसून आले.

शहरात विकासकामांच्या नावाखाली जुन्या रस्त्यावर नवीन रस्ते बांधण्यात आले. त्यात सर्वत्र अमृत दोन योजनेतून घराघरातून मल्लनिसारण करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. निदान या कामात तर रस्त्यांची उंची कमी करणे अपेक्षित होते. पण अधिकाऱ्यांची बेपर्वाई पाहता, अत्यंत तकलादू काम सुरू आहे. परिणामी सध्या झालेल्या आणि सध्या अर्धवट काम असलेल्या ठिकाणी पावसामुळे त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. काही ठिकाणी दोन-तीन फुटांच्या मोठ्या चॅनलमध्ये ठेकेदारांनी परस्पर अमृत दोन योजनेतील नऊ इंचाची पाइपलाइन घातल्याने,त्याचाही फटका बसल्याचे दिसून आले.

अगोदरच रस्त्यावर रस्ते केल्याने, नागरिकांची घरे खाली जाऊन‌ रस्ते वर आले आहेत. तर अनेक ठिकाणी गटारांचे कामही समाधानकारक झालेले नाही. त्यामुळे आता पुन्हा पावसात सांडपाणी थेट सखल भागातील नागरिकांच्या घराघरात शिरण्याचा धोका अधिक वाढला आहे. गटरीतील प्लॅस्टिक कचराही याला कारणीभूत ठरत आहे. महानगरपालिकेच्या पावसाळ्यापुर्वी नालेसफाईचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.