पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले, आरवली–कांटे पट्ट्यात नियोजनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे बहुचर्चित काम 17 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात असल्याचे दावे होत असतानाच, पहिल्याच पावसाने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरवली ते कांटे दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने महामार्ग काही ठिकाणी तलावासारखा दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच्या नियोजनातील त्रुटी समोर आल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थितीत तांत्रिक नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. आरवली–कांटे पट्ट्यात रस्ता अनेक ठिकाणी समतल नसल्याचे तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक आउटलेट्सचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काही महिन्यांत समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने चालवताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात वाहने अडकत असून, वाहतूक संथ झाली आहे.

साचलेल्या पाण्यातून मोठी वाहने जाताना लहान वाहनांवर पाणी उडत असल्याने दुचाकीस्वार आणि कारचालक त्रस्त झाले आहेत. यामुळे काही ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी कोकणवासीयांनी दीर्घ प्रतीक्षा केली असताना, कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कोट्यवधींचा खर्च होऊनही मूलभूत निचरा व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसाची सुरुवातच अशी परिस्थिती निर्माण करत असल्याने पुढील काळात महामार्गावरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता संबंधित यंत्रणा कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.