मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाजारात रस, मात्र, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, खडसेंचा हल्लाबोल

Eknath Khadse : राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये केळी उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच मुद्यावरुन माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.  केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे, मात्र जळगाव (jalgaon) जिल्ह्यात चार मंत्री असूनही रक्षा खडसे वगळता बाकीच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही

या मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाज करण्यात रस जास्त आहे मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, माझेही नुकसान झालं आहे असे खडसे म्हणाले. जिल्ह्यात मंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही असे खडसे यावेळी म्हणाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिक भूईसपाट झाली आहेत. विक्रीसाठी तयार झालेला माल या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळं मातीमोल झाला आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

जळगावमधील रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर परिसरात मोठं नुकसान

सलग तीन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. निरुळ, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रूक, अटवाडे, खिर्डी, ऐनपूर, रसलपूर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील तापीकाठच्या गावांमध्ये केळीच्या बागा मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाल्या. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे परिसरातही जोरदार वाऱ्यांमुळे केळीचे नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील गोरगावले, माचले, मंगरूळ, वर्डी, खर्डी, पंचक आणि धानोरा या भागांत वादळामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यावल तालुक्यातील किनगाव, मनवेल, न्हावी आणि थोरगव्हाण परिसरालाही मोठा फटका बसला आहे. यावल, जळगावचोपडा, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Comments are closed.