महाराष्ट्रात हे काय घडतंय! एकाच दिवशी तीन बॉम्बस्फोटांच्या धमक्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात भाजप-शिंदे सरकार सफशेल अपयशी ठरले असताना आज एकाच दिवशी मुंबईचे महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुण्यातील मोतीबाग येथील ‘आरएसएस’चे कार्यालय आणि नागपूर येथील ‘आरएसएस’ मुख्यालय अशी तीन ठिकाणेबॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ई-मेल येताच पोलिसांनी संबंधित ठिकाणे रिकामी करून डॉग स्कॉडच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. शिवाय कार्यालयाबाहेर बंदुकधारी पोलीस आणि पालिकेची सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर-प्रकल्प यांच्या मेलवर सकाळी धमकीचा मेल आला. महापौर कार्यालयासह महापौरांची गाडीदेखील बॉम्बने उडवण्याची धमकी मेलमध्ये देण्यात आली आहे. शिवाय याच ई-मेलमध्ये ‘सीएमओ’ कार्यालयदेखील बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आली. बॉम्बस्फोट धमकीची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थाही सतर्क झाली. सुरक्षा यंत्रणेकडून पालिका मुख्यालयाच्या बेसमेंटसह महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. पुणे पालिका आणि ‘आरएसएस’ कार्यालयाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र या ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यातील बॉम्बस्फोट धमकीप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खलिस्तानी नावाने आला मेल

मुंबई-पुणे महापालिका आणि ‘आरएसएस’ कार्यालयाला ‘खलिस्तानी’ नावाने हा ई-मेल आला आहे. मुंबई महापालिकेला आलेल्या मेलनुसार ‘बॉम्बे गुंजेगा खलिस्तान’ असा मेसेजही या मेलमध्ये आहे. याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

धमक्यांना घाबरणार नाही – महापौर

अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना आपण मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी महापौर रितू तावडे यांनी दिली.

1 मुंबई महापालिकेला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा धमकीचा मेल आला. ई-मेलनुसार मुंबई मेयर ऑफिस, सीएम ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
2 पुणे महापालिकेच्या मेलवर सकाळी 8 वाजून 21 मिनिटांनी धमकीचा मेल आला. पुण्यातील महत्त्वाच्या तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी या मेलवरून देण्यात आली.
3 नागपूरमधील ‘आरएसएस’ मुख्यालय उडवून देण्याचा मेल दुपारी 3.11 मिनिटांनी प्राप्त झाला. नागपूरमधील विविध शाखांना लक्ष्य करण्याचा उल्लेख मेलमध्ये आहे.

Comments are closed.