TMC काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

ममता बॅनर्जी सकारात्मक असल्याची चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस सध्या आपल्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. पक्षात मोठी फूट पडल्याने टीएमसीच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबत चर्चा पुढे सरकली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळच्या सूत्रांनुसार, ममता बॅनर्जी सोनिया गांधींचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहेत, परंतु त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यामार्फत राहुल गांधींपुढे काही अटीही ठेवल्याचे समजते.

अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींसोबतच्या बैठकीत विलीनीकरण विषयावर चर्चा केली. ममता बॅनर्जी यांना राज्यसभेत पाठवावे आणि त्यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. मात्र, यावर काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. सोनिया गांधींनी स्वत: ममता बॅनर्जींना फोन करून टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे.

गांधी-बॅनर्जी भेटीगाठी वाढल्या

गेल्या दोन दिवसांत (8 आणि 9 जून) टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी दोनदा भेट घेतल्याने टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये आपुलकी स्पष्टपणे दिसून आली. ममता आणि सोनिया यांनी एकमेकींना मिठीही मारली. त्यानंतर राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांचीही भेट झाली. दोघांमध्ये 10 जनपथ येथे अंदाजे दीड तास चर्चा चालल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Comments are closed.