ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट, बारवी धरणात २७ टक्के तर चिखलोली धरणात अवघे ७ टक्के पाणी उरले
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात अवघे २७.६६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर चिखलोली धरणाने तळ गाठला असून त्यात अवघे ७ टक्के इतकेच पाणी राहिले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. त्यातच पाऊस लांबला तर परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यातही कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे होणाऱ्या तीव्र बाष्पीभवनामुळे पाणी साठे वेगाने आटू लागले आहेत. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पाण्याची परिस्थिती भीषण होत चालली आहे.
अंबरनाथमध्ये एक दिवसाआड पाणी
अंबरनाथ शहर पूर्वेकडील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणात अवघे ७ टक्के इतके पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
बदलापुरात पाणी कपात
हवामान खात्याने दिलेल्या ‘अल निनो’ व ‘आयओडी’च्या इशाऱ्यामुळे बदलापूरमध्ये चार महिने १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले असून १५ जूनपासून ही पाणी कपात सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. खत्री यांनी दिली.
गेल्या वर्षी ८ जून २०२५ रोजी बारवी धरणात ३६.६५ टक्के पाणी शिल्लक होते. यावर्षी मात्र ८ जूनपर्यंत धरणात अवघे २७.६६ टक्के पाणी राहिले आहे.
Comments are closed.