बीड जिल्हा हादरला… महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण, नेमकं प्रकरण काय?

बँकेच्या कर्जाचे जामीनदार राहण्यावरून आणि पैशांच्या जुन्या व्यवहारातील वादातून एका महाविद्यालयीन लिपिकाचे अपहरण करून त्यांना लाकडी दांडक्याने व बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील परळी येथे घडली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले अनिल बाबुराव पत्की यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पत्की यांचेआरोपी वैजनाथ यादव याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून ओळखीचे संबंध होते आणि त्यांच्यात पैशांची देवाणघेवाणही सुरू होती. पत्की यांनी यादवकडून घेतलेले एक लाख रुपये परत केले होते, तरीही यादव त्यांच्याकडे आणखी चार लाख रुपयांची जादा मागणी करत होता. दुसरीकडे, यादवने बँकेकडून घेतलेल्या एका कर्जासाठी पत्की जामीनदार राहिले होते. या जामीनकीतून आपले नाव काढून घेण्यासाठी पत्की यांनी यादवकडे तगादा लावला होता. याच कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते.

बहाण्याने नेले अन्…

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास, पैशांचा हिशोब पूर्ण करण्याच्या बहाण्याने वैजनाथ यादव याने लिपिक पत्की यांना आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्याने पत्की यांना काळरात्री देवी मंदिराजवळील एका निर्जन ठिकाणी झाडाखाली नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या दोन अनोळखी साथीदारांच्या मदतीने यादवने पत्की यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

दोन तास ओलीस ठेवून मारहाण

आरोपींनी लाकडी काठी आणि बेल्टने पत्की यांच्या पाठीवर, डोक्यावर व पायावर गंभीर वार केले. “जर आरडाओरडा केला किंवा पोलिसांत गेलात, तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी देत आरोपींनी तब्बल दोन तास पत्की यांना ओलीस ठेवून मारहाण केली. एवढेच नव्हे तर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पत्की यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेत त्यांचा मोबाईलही गायब केला.

गुन्हा दाखल, तपास सुरू

दरम्यान, या जीवघेण्या हल्ल्यातून सुटका झाल्यानंतर जखमी अनिल पत्की यांनी तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालय गाठून उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी थेट परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार करत आहेत.

Comments are closed.