2019 पासून मोदींनी निवडणूक चोरली म्हणून ते लोकांमधून निवडून आलेले पंतप्रधान नाहीत, संजय राऊत यांचा घणाघात
काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संपूर्ण काँग्रेस आपल्यातच विलीन करून घेतली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच 2019 पासून मोदींनी निवडणूक चोरली म्हणून ते लोकांमधून निवडून आलेले पंतप्रधान नाहीत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संपूर्ण काँग्रेस आपल्यातच विलीन करून घेतली आहे. भ्रष्ट, कारस्थानी, कपटी असे शब्द त्यांनी वापरले. सगळी काँग्रेस त्यांनी भाजपमध्ये सामील करून घेतली आहे. भाजपच्या मनात आणि रक्तातच कपट आहे. तसं नसतं तर ज्यांचे मोदींवर प्रचंड उपकार आहे ती हिंदुत्ववादी शिवसेना फोडली. ज्या पवारांचे मोदींवर उपकार आहेत त्याच पवारांची राष्ट्रवादी फोडली. असे अनेक पक्ष, नेते ज्यांनी मोदी शहांवर उपकार केले, मेहेरबानी केली त्यांचे पक्ष फोडले हे कपटकारस्थानच आहे. आणि मोदींनी कुठलाही विक्रम केलेला नाही. पंडित नेहरु हे 16 वर्ष पंतप्रधान होते, 15 ऑगस्ट ते 1947 पासून ते निवडून आलेले पंतप्रधान होते. 1947 साली जेव्हा नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल होते. जर नेहरुंचा ते कालखंड मानायल तयार नसतील याचा अर्थ ते पटेलांना देशाचे गृहमंत्री मानत नाहीत. डॉ. बाबासाहेबांना कायदामंत्री मानायला मोदी तयार नाहीत. नेहरु 16 वर्ष पंतप्रधान होते, स्वातंत्र्यानंतर हा देश नेहरुंच्या हातात होता, तेव्हा ब्रिटिशांनी लुटलेला हा देश कंगाल आणि गरीब होता. त्यातून हा देश नेहरुंनी उभा केला. मोदींना अजून खूप काम करायचे आहे. मोदींनी अजूनही कामाला सुरूवात केलेली नाही, आजही ते कपट कारस्थान यातच गुंतलेले आहेत. मोदींनी पक्ष फोडले, लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं. नेहरुंनी हे केलेले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींची ही भाषणं आम्ही गांभीर्याने घेत नाहीत. 2014 ते 2019 हा मोदींचा कार्यकाळ होता, कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. त्यानंतरची प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणूक होती. मोठ्या अपेक्षेने लोकांनी 2014 साली त्यांना निवडून दिलं होतं. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत जनतेने त्यांना पराभूत केलेले असताना पैसे, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या माध्यमातून ते निवडून आले. 2024 च्या निवडणुकीत त्यांना बहुमतच नाही. आणि ज्या जागा जिंकल्या त्या चोऱ्या माऱ्या करून जिंकल्या आहेत. 2019 पासून मोदींनी निवडणूक यंत्रणेत, प्रशासनात घोटाळे करून निवडणूक चोरली किंवा ताब्यात घेतली, असेही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस अधिक सक्षम झाली पाहिजे. जे नेत्यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केले आहे त्यांनी देशाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आणि त्यातूनच एक अखंड आणि प्रबळ अशी काँग्रेस उभी राहिली पाहिजे. शरद पवार यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसबाहेर पडून ज्या नेत्यांनी वेगळे पक्ष स्थापन केले आज तेच नेते आणि पक्ष काँग्रेससोबत काम करत आहेत. सरकारमध्ये असतात, किंवा अनेक प्रवाहांमध्ये एकत्र आहेत. हा विचार सगळा एकत्र आला तर नरेंद्र मोदी यांनी कपट आणि कारस्थानच्या माध्यमातून देशावर जो भ्रष्ट कारभार लादला आहे, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल.
ट्रम्प यांनी मोदींची प्रशंसा केली. यावर संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प कुणाचीही वाहवा करतात आणि दोन दिवसांनी ते वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटलं हे सगळ्यांना माहित आहे. कालच ओमानमध्ये अमेरिकन सैन्याकडून भारतीय जहाजावर हल्ले झाले. त्यात आपले दोन लोक ठार झाले. आमचे तेलाचे टँकर उडवले. ही वाहवा आहे का. त्या संदर्भात नरेंद्र मोदींनी एक चकार शब्द काढलेला नाही. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याला बोलावलं आणि निषेध व्यक्त केला.
2014 पासून हा देश खऱ्या अर्थाने दृष्टचक्रात सापडला. हे दृष्टचक्र अजूनही सुरू आहे. या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी देशाला आणखी एक स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल. त्यासाठी आमची तयारी आणि जुळवाजुळव सुरू आहे. ब्रिटिशांचे, मोगलांचे जे दुष्टचक्र होते, त्याच पद्धतीने दिल्लीत घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे. आणि हेच घाशीराम कोतवाल देशाला लुटत आहेत. त्यामुळे आम्हा सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढावी लागेल. मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली, आणि ते म्हणतात तशी आख्खी भ्रष्ट, कपटी काँग्रेस त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतली.
Comments are closed.