आज रात्री इराणवर मोठा हल्ला करणार, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शांततेसाठी चर्चा सुरु असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा देत म्हटले आहे की, आजची रात्र इराणसाठी खूप जड जाणार आहे. आज रात्री इराणला खूप मोठा फटका बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ट्रुथ सोशलवर पोस्ट करत त्यांनी ही धमकी दिली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, “अमेरिका आज रात्री इराणवर जोरदार हल्ला करणार आहे.” तसेच इराणचे नौदल, हवाई दल, रडार, अँटी-एअरक्राफ्ट आणि संरक्षणाची सर्व यंत्रणा (सिस्टीम) उद्ध्वस्त झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पुढील रणनीतीही स्पष्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “लवकरच एका ठराविक वेळी आम्ही खार्ग आयलंड आणि तेलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांवर ताबा मिळवू आणि तेल व गॅस मार्केटवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू, अगदी तसेच जसे आम्ही व्हेनेझुएलासोबत केले आहे.”

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला होता. तेव्हापासूनच मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी होण्याची आशा निर्माण झाली होती. इराणसोबतची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचा दावाही ट्रम्प यांनी वारंवार केला होता. यातच आता पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे.

Comments are closed.