गृहिणी ही दासी नसून राष्ट्रनिर्माती आहे
लक्षावधी गृहिणींसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नोकरी न करता घर सांभाळणाऱ्या गृहिणी या मोलकरणी नसून त्या ‘राष्ट्रनिर्मात्या’ आहेत, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गृहिणी घरात जी कामे करतात त्यांचे मूल्य नीटपणे ओळखण्याची आवश्यकता आहे. पण अनेकदा तसे होत नाही. त्यांना विनावेतनाच्या मोलकरणीसारखी वागणूक दिली जाणे अयोग्य असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. हा निर्णय देशातील लक्षावधी गृहिणींचा सन्मान वाढविणारा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गृहिणींच्या कार्याचे महत्त्व विषद करताना न्यायालयाने अनेक कारणे दिली आहेत. गृहिणी घरात जी कामे करतात त्यांचे व्यवहारी मूल्य निश्चित केले जात नाही. तसे हिशेब कधी ठेवले जात नाहीत. तथापि, पैशाच्या भाषेत हिशेब करायचाच, तर प्रत्येक गृहिणी महिन्याला किमान 30 हजार रुपयांचे काम करते, असे म्हटले पाहिजे. संपूर्ण घराचे उत्तरदायित्व तिच्यावर असते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.
प्रकरण काय आहे…
वाहन अपघात प्रकरणातील भरपाई देण्याच्या संदर्भातले हे प्रकरण आहे. हानी भरपाईचे प्रमाण ठरविताना नेहमी अपघातग्रस्ताच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जातो. अपघातग्रस्त कमावता असेल, तर त्याला अधिक भरपाई मिळते. भरपाईची रक्कम ठरविताना त्याच्या उत्पन्नाची कागदपत्रे पडताळली जातात. प्राप्तिकर विवरणपत्रे, वेतन पावत्या आदी प्रमाण मानल्या जातात. तथापि, एखादी गृहिणी अपघातग्रस्त झाली, तर तिच्या कामाचे मूल्य स्पष्ट करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याने तिला कमी भरपाई दिली जाते. ही पद्धत अत्यंत असमतोल आणि अन्याय्य आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. गृहिणीचे घरकाम कमी मूल्याचे नसते. तिचे उत्तरदायित्व मोठे आहे. ते लक्षात घेऊन हानी भरपाईची रक्कम निर्धारीत केली पाहिजे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
गृहिणीचे योगदान अनन्यसाधारण
ग़ृहिणी घरात राहून घरासाठी जे काम करतात, त्यामुळे घराला मोठा आधार मिळतो. घराला घरपण देण्यात गृहिणीचे योगदान अनन्यसाधारण असते. केवळ तिच्या कामाचे आर्थिक मूल्यमापन कागदपत्रांच्या आधारे होऊ शकत नाही, म्हणून त्यांच्या कामाचे महत्व नाकारणे सर्वथैव अयोग्य आहे. त्यांच्या कामाचे पैशाच्या हिशेबात मूल्यमापन होणे आवश्यक आहे. असेही न्यायालयाचे निरीक्षण आहे.
अंदाजे किंमत प्रति महिना 30 हजार आहे
गृहिणीच्या घरकामाचे अनुमानित मूल्य (नोशनल व्हॅल्यू) सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात प्रतिमहिना 30 हजार रुपये इतके कल्पिलेले आहे. त्यानुसार अशा प्रकरणांमध्ये त्यांच्या हानी भरपाईचे प्रमाण ठरवावे, असा नियम न्यायालयाने या निर्णयाच्या माध्यमातून घालून दिलेला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय न्या. संजय कारोल आणि न्या. ए. जी. मसीह यांनी दिला आहे. या निर्णयावर अनेक मान्यवरांनी सकारात्मक आणि समाधानी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा निर्णय लिंगभेदामुळे महिलांवर होणारा अन्याय दूर करणारा आहे. तसेच तो महिलांना न्याय आणि सन्मान देणारा आहे, अशी मते अनेकांनी व्यक्त केलेली आहेत.
आपुलकीची किंमत पैशात होणे कठीण
एकीकडे या निर्णयामुळे महिला अधिकार कार्यकर्ते आनंदात असताना, अनेक गृहिणींनी मात्र, एक भिन्न प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शतकानुशतके अर्थार्जन करणारे काम न करता घरकाम करत आहोत. हे काम आम्ही घरासंबंधी आणि कुटुंबासंबंधी असणारी आपुलकी आणि आम्हाला वाटणारे प्रेम यांच्यापोटी करतो. त्याची किंमत पैशात कशी केली जाऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
दूरगामी परिणाम करणारा निर्णय
- गृहिणींचा सन्मान वाढविणारा हा निर्णय असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया
- गृहिणींच्या घरकामाचे अनुमानित मूल्य किमान 30 हजार रुपये महिना
- सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत
Comments are closed.