हरियाणाच्या हांसीमध्ये जिम ऑपरेटरची हत्या.
पाच सेकंदात झाडल्या दहा गोळ्या
वृत्तसंस्था/हांसी
हरियाणातील हांसी येथे गुरुवारी पहाटे 5:30 वाजता जिम ऑपरेटर कपिल रेढू (25) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोराने एकापाठोपाठ अंदाजे 10 गोळ्या झाडल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गोळीबारावेळी जिम ऑपरेटर रॅम्पवर मुले आणि मुलींकडून वॉर्म-अप करून घेत होते. मोटरसायकलवरून हेल्मेट घातलेले दोन शूटर दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच सेकंदात त्यांनी .45 कॅलिबरच्या बंदुकीतून कपिलच्या डोक्यावर आणि पाठीवर अगदी जवळून 10 गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. या गोळीबारामध्ये तेथेच असलेली शिखा नावाची एक तरुणीही जखमी झाली असून तिच्यावर हिसार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरियाणातील हिसार जिह्यातील हांसी येथील फव्वारा चौकात सकाळच्यावेळी झालेल्या जिम ऑपरेटर कपिल रेढू यांच्या हत्येने खळबळजनक वळण घेतले आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने आता या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या गँगचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गँगस्टर हरी बॉक्सरने हत्येची कबुली देणारी एक ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध केली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये, लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून स्वत:ची ओळख सांगत आहे. या कथित ऑडिओमध्ये, हरी बॉक्सरने केवळ हांसी हत्येचीच नव्हे, तर दिल्लीतील आणखी एका मोठ्या घटनेचीही जबाबदारी स्वीकारली आहे. गायक गुरू रंधावाच्या दिल्लीतील ‘ट्वेंटी फोर अवर्स फिटनेस’ या जिममध्ये गुरुवारीच गोळीबार झाला होता. हा गोळीबार आपला भाऊ अनिल पंडित, हरमन संधू आणि हार्डी धालीवाल यांनी केल्याचा दावा ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.
Comments are closed.