हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले, प्रवाशांची रुळावरून पायपीट
मुंबईकरांची लाईफलाईन पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी सकाळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीचा बोजवारा उडाला. एका ओव्हरहेड वायरवर दुसरी ओव्हरहेड वायर पडल्याने पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल स्थानकाहून निघालेली लोकल 9 वाजून 10 मिनिटांपासून चेंबूर स्थानकावर थांबलेली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्वच लोकल एकामागोमाग एक उभ्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून पायपीट करत पुढील स्थानक गाठावे लागत आहे.
मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड इक्विपमेंटवर एक वायर लटकत असल्याचे आढळून आले. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तातडीने या मार्गावरील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे सकाळी 9 वाजून 16 मिनिटांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप आणि पनवेलकडे जाणारी डाऊन वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. या बिघाडामुळे एक लोकल ट्रेन कुर्ला रेल्वे स्थानकात अडकून पडली आहे.
ट्रेन अपडेट:
ओएचईवर तार लटकल्याने अप आणि डाउन हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा 09:16 वाजल्यापासून थांबवण्यात आली आहे.
पुनर्स्थापना कार्य प्रगतीपथावर आहे, आणि शक्य तितक्या लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.
झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत…— डीआरएम मुंबई सीआर (@drmumbaicr) 12 जून 2026
दरम्यान, युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करतो, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
Comments are closed.