अमेरिकेची समुद्रात चाचेगिरी, जहाजावरील हल्ल्यात तीन हिंदुस्थानींच्या मृत्यूवरून इराणचा आरोप
ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. याचे तीव्र राजनैतिक पडसाद उमटत आहेत. या दुर्दैवी घटनेत तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मध्य पूर्व आणि आखाती प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंदुस्थानी व्यापारी जहाजांवर होणारे असे हल्ले म्हणजे सशस्त्र दरोडा आणि शासकीय चाचेगिरी असल्याचा आरोप इराणने केला आहे.
या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यासाठी थेट अमेरिकेला जबाबदार धरत, हिंदुस्थानी व्यापारी जहाजांवर होणारे असे हल्ले म्हणजे सशस्त्र दरोडा आणि शासकीय चाचेगिरी असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘सेटेबेलो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या या हल्ल्याची गंभीर दखल घेत याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर एकूण 24 हिंदुस्थानी कर्मचारी तैनात होते. घटना घडल्यानंतर तातडीने राबवण्यात आलेल्या मदत आणि बचाव कार्यात 21 हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे, मात्र दुर्दैवाने तीन हिंदुस्थानी अद्याप बेपत्ता आहेत. ओमानमधील हिंदुस्थानी दूतावास या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम आणि बचाव कार्यात सक्रिय समन्वय साधत आहे.
या घटनेमुळे सागरी व्यापारी मार्गांच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थान सरकारने कमालीची चिंता व्यक्त केली आहे. सागरी क्षेत्रातील अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया या संबंधित प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिंदुस्थानने या भागातील युद्धसदृश परिस्थिती आणि वाढता तणाव तात्काळ निवळण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण आखाती प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक वाटाघाटी लवकरात लवकर पूर्ण करून ठोस राजनैतिक तोडगा काढण्याची गरज असल्याचे हिंदुस्थानने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
Comments are closed.