कुर्धेतील पुलाच्या बोगस कामाची चौकशी करा, शिवसेनेची मागणी
मौजे कुर्धे येथील पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू झाला.अंदाजपत्रक आणि कार्यारंभ आदेश मिळण्याच्या आधीच आगाऊ काम करण्यात आले होते. या बेकायदेशीर आणि बोगस कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षांकडे आज निवेदनाद्वारे केली.
कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान नदीवर जिल्हा परिषद बांधकाम कंत्राटदाराकडून पुलाचे काम सुरू होते. मंगळवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या कामाचे कोणतेही अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा आणि कार्यारंभ आदेशही नव्हता कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कंत्राटदाराने कोणाच्या आदेशाने हे काम सुरू केले? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
कंत्राटदारांचा परवाना रद्द करा
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कंत्राटदारांची मनमानी आणि बोगस कामे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अशा बोगस कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी देऊ नये, तसेच विनापरवाना काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी केली आहे. या भ्रष्टाचारात जर जिल्हा परिषदेचे अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करून केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवासेना जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख किरण तोडणकर, साजिद पासवकर, उपविभाग प्रमुख सचिन सावंतदेसाई, अजिंक्य सनगरे आणि आदेश भाटकर उपस्थित होते.
Comments are closed.