खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका

कोलकाता: पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ता बदलानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल कांग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणी (Fake Signature Case) पश्चिम बंगाल सीआयडीने (CID) दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 14 जून रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेत तपास यंत्रणांच्या ‘टायमिंग’वर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सीआयडीचे अधिकारी शुक्रवारी अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी नोटीस देण्यासाठी पोहोचले होते. बॅनर्जी घरात नसल्यामुळे अधिकाऱ्यांना तब्बल 3 तास ताटकळत राहावं लागलं. या घडामोडींनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी सरकारवर आणि तपास यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला.

‘तपास यंत्रणांना नेहमीच सहकार्य करतो’

अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “यापूर्वी सीआयडीने मला बोलावले होते, तेव्हा मी साडेपाच तास तिथे थांबून चौकशीला सामोरे गेलो. आता मला 14 जूनला पुन्हा बोलावण्यात आलं आहे, तेव्हाही मी नक्की जाईन. मी नेहमीच तपास यंत्रणांना सहकार्य करतो. मी घरी नसताना अधिकारी नोटीस घेऊन आले होते. माझ्या अनुपस्थितीत इतर कोणाकडे नोटीस देण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांना माझ्या येण्याची वाट पाहावी लागली.”

सरकार बदलताच केसेसचा सपाटा सुरू

अभिषेक बॅनर्जी यांनी या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा थेट आरोप केला आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी माझ्याविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, आता बंगालमध्ये सरकार बदललं आहे, त्यामुळे माझ्यावर वारंवार गुन्हे दाखल केले जात आहेत,” असं बॅनर्जी म्हणाले.

कोर्टात सुरू असलेल्या या प्रकरणाची गोपनीय माहिती सीआयडीकडून जाणीवपूर्वक मीडियामध्ये लीक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या माहिती लीक करण्याच्या प्रकाराविरोधात आपण उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं.

‘टीएमसी मागे हटणार नाही’

अमित शाह यांच्या भडकावू वक्तव्यांवर गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. तसेच, आम्ही या लढाईत एक इंचही मागे हटणार नाही. तुम्ही आम्हाला झुकवू शकत नाही आणि आम्ही या तपास यंत्रणांना घाबरत नाही. आमदार आणि खासदार विकत घेऊन टीएमसीला संपवणे शक्य नाही. तुम्ही निवडणुकीत अन्नपूर्णा भंडार देण्याचे आश्वासन दिले होते, पण आता राज्यातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.

ही बातमी वाचा:

Comments are closed.