पावसाळ्यातल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबईत एकात्मिक आराखडा तयार होणार; रेल्वे, महापालिका आणि बेस्टचा सहभाग

पावसाळ्यात पूरपरिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करून समन्वयाने काम करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामाचा व मान्सून पूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी उपनगर जिह्याचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी आज पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.

रेल्वेकडून उपसा पंपात वाढ

पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरार या दरम्यान एकूण 15 मायक्रो टनेल रेल्वे रुळांच्या खालून करण्यात आले आहेत. पाणी उपसण्यासाठी यंदा 126 कंप बसवले, तर 2400 वॅगन भरून गाळ काढण्यात आला. मध्य रेल्वेच्या मार्गावर 220 कंप बसवण्यात आले आहेत. 350 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील 160 नाले व गटारांची सफाई करण्यात आली.

होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट

दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झालीच तर ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी होईल अशा रेल्वे स्टेशनमधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकूण परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लॅन तयार करा,  रेल्वे स्टेशनमधील आणि बाहेरील पादचारी पूल, वाहतूकीचे पूल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

Comments are closed.