शब्दमुद्रा – व्रतस्थ अनुवादक
<< पू. विठ्ठल
[email protected]
हिंदी भाषा साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, अनुवादक, लेखक अशी साहित्यक्षेत्रात अजोड ओळख असणारे प्रा.बलवंत जेऊरकर. त्यांच्या निधनाने मराठी हिंदी अनुवाद क्षेत्रातील महत्त्वाचा सेतू हरपला आहे.
अनुवादाच्या क्षेत्रात अत्यंत भरीव योगदान देणारा लेखकमित्र बलवंत जेऊरकर याचे असे अचानक जाणे विलक्षण वेदनादायी… वयाच्या अवघ्या 51 व्या वर्षी या सर्जनशील कलावंताने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या या लेखकाचा व्यासंग थक्क करणारा आहे. प्रा. बलवंत जेऊरकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आयुष्यभर अनुवादाचे काम केले. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून ते हिंदी विषयाचे अध्यापन करत होते. स्नायूच्या दुर्मिळ आजाराने ते काही काळापासून त्रस्त होते, पण त्यांच्या अध्ययन, संशोधन आणि लेखनात खंड पडला नव्हता. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर मर्यादित असला तरी सांस्कृतिक घडामोडींकडे त्यांचे बारीक लक्ष होते.
‘हिंदी’ हा अभ्यासविषय आणि ‘मराठी’ ही मातृभाषा असल्यामुळे या दोन्ही भाषांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. अत्यंत महत्त्वाच्या नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाल्यामुळे इतर भाषांतही त्यांना ओळखणारा मोठा वर्ग होता. विशेषत हिंदीतील कितीतरी लेखकांशी त्यांचा व्यक्तिगत परिचय होता. 2005 साली त्यांनी साहित्य अकादमीसाठी ज्येष्ठ कवी मंगेश डबराल यांच्या ‘हम जो देखते है’ या कवितासंग्रहाचा ‘आपण जे पाहतो’ हा अनुवाद केला. या पुस्तकाची मोठी चर्चा झाली. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या त्यांच्या या अनुवादाचे कौतुक झाले. यानंतर राजेश जोशी यांच्या ‘दो पंक्तियों के बीच’ या कवितासंग्रहांचा ‘दोन ओळींच्या दरम्यान’ (2009) हा अनुवाद केला. याच संग्रहाला 2015 साली साहित्य अकादमीचा ‘अनुवाद पुरस्कार’ मिळाला. यानिमित्ताने त्यांच्या अनुवाद कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली.
त्यांनी केवळ छंद वा हौस म्हणून नाही, तर एक सांस्कृतिक कार्य किंवा प्रकल्प म्हणून अनुवादाचे काम केले. अमृतराय यांनी लिहिलेल्या ‘कलम का सिपाही’ या बृहद चरित्रग्रंथाचा ‘प्रेमचंद ः लेखणीचा शिलेदार’ हा त्यांनी केलेला अनुवाद तर त्यांच्या अफाट परिश्रमाची साक्ष देणारा आहे. मुळात प्रेमचंद हे भारतीय पातळीवरचे श्रेष्ठ लेखक. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा मराठी भाषेतही मोठा वाचक वर्ग आहे. मात्र त्यांच्याविषयी विस्तृत चरित्रात्मक माहिती फारशी उपलब्ध नव्हती. या अनुवादामुळे प्रेमचंद यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचा मोठा दस्तऐवज मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाला.
कविता, कथा, कादंबरी, लेख अशा सर्व साहित्यप्रकारांविषयी जेऊरकरांना आस्था असली तरी श्रेष्ठत्वाच्या निकषावरच त्यांनी अनुवादाला प्राधान्य दिले. केदारनाथ सिंह, पवन करण, स्वयंप्रकाश, कुमार अंबुज, वीरेन डगवाल, मुनी क्षमासागर, नरेश सक्सेना, ज्ञानेन्द्रपती, प्रियंवद, गोविंद मिश्र, विष्णू नागर, योगेंद्र आहूजा, बद्रीनारायण, बोधिसत्व, असगर वजाहत, अनिता वर्मा अशा कितीतरी साहित्यिकांचा त्यांनी मराठी वाचकांना परिचय करून दिला. अगदी अलीकडेच त्यांनी बद्रीनारायण यांच्या ‘तुंबडी के शब्द’ या संग्रहाचा अनुवाद केला आहे.
जेऊरकर हे अनुवादक म्हणून दखलपात्र होतेच, पण त्यांची समीक्षादृष्टीही खूप महत्त्वाची आहे. त्यांनी विविध कलाकृतींचे अनुवाद करताना जे भाष्य केले आहे, ते यासंदर्भात लक्षात घ्यायला हवे. पवन करण यांच्या ‘स्त्री मेरे भितर’ या संहितेचा ‘स्त्री माझ्या आत’ हा अनुवाद तर खूप सहज आणि प्रवाही झाला आहे. मूळ संहिता मराठीच असावी इतका हा निर्दोष अनुवाद आहे. अनुवादाबाबत जेऊरकर कधीच एकाच वाङ्मय प्रकारात अडकून पडले नाहीत. त्यांची वाङ्मयीन समज, भूमिका आणि दृष्टी खूप व्यापक होती. भारतीय साहित्यपरंपरेला समृद्ध करणाऱ्या अनेक लेखक-कवींना त्यांनी मराठीत आणले.
अनुवाद म्हणजे केवळ शब्दांचे रूपांतर नसते, तर मूळ संहितेतील सांस्कृतिक, भाषिक संदर्भांसह निर्दोष अनुवाद करणे, ही खूप कठीण गोष्ट असते. जेऊरकरांनी ही गोष्ट परिश्रमपूर्वक साध्य केली होती. अनेक महत्त्वाचे सन्मान त्यांच्या वाट्याला आले. अत्यंत व्रतस्थपणे अनुवादाला वाहून घेणाऱ्या बलवंत जेऊरकरांचे असे अकाली जाणे खूप वेदनादायी आहे.
‘मी म्हणत नाही की शरीर ही अपवित्र गोष्ट आहे पण त्याची सतत काळजी करत राहण्याइतकी ती पवित्रही नाही ’
पवन करण यांच्या एका कवितेतील ओळींचा त्यांनी केलेला हा अनुवाद खूप सूचक आहे. त्यांना झालेल्या दुर्मिळ आजाराचे परिणाम काय होणार आहेत, याची त्यांना जाणीव होती. ‘आता फार दिवस राहिले नाहीत, म्हणून शक्य तेवढी कामं उरकून घेतोय’ असं ते म्हणतदेखील. मृत्यूची चाहूल त्यांना लागली होती, असं म्हणताना कापरासारखं एखादं उमदं व्यक्तिमत्व विरून जावं इतकं हे वेदनादायी आहे. अशा लेखकमित्राला ही शब्दातीत आदरांजली!
(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक असून कवी आणि समीक्षक आहेत.)
Comments are closed.