हैदराबादमध्ये सीजेपीचे निदर्शने
न्यूज एजन्सी/ हैदराबाद
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये रविवारी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि अन्य संघटनांनी मिळून तीव्र निदर्शने केली आहेत. नीट पेपर लीक अन् सीबीएसईच्या मार्किंग सिस्टीममध्ये झालेल्या गडबडीवरून यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. निदर्शकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत:च्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी निदर्शकांकडून करण्यात आली.
या निदर्शनांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सामील झाले. हे आंदोलन कुठलीही राजकीय सत्ता मिळविणे किंवा कुठल्याही पक्षाला आव्हान देण्यासाठी नाही. याचा खरा उद्देश जनतेला जागरुक करणे आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आहे. हे आंदोलन शिक्षणमंत्री होणे किंवा नवा पक्ष निर्माण करण्यासाठी नाही. देशाच्या युवांसोबत होत असलेल्या चुका सुधारण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे आंदोलन एक जागरुकता किंवा परिवर्तनाची सुरुवात असल्याचा दावा सोनम वांगचुक यांनी केला.
व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. भय अन् द्वेषाने पूर्णपणे मुक्त लोकशाहीची भारताला गरज आहे. भविष्यात प्रत्येकाला कुठलाही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशाप्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करायला हवी. ही लढाई केवळ परिक्षांपुरती मर्यादित नाही. याचा उद्देश व्यवस्थेचा पाया मजबूत करणे आहे, ज्यासाठी पुढील रस्ता तयार केला जाणार असल्याचे उद्गार वांगचूक यांनी काढले आहेत.
Comments are closed.