हिंदुस्थानी जहाज बुडाले, 14 खुलाशांची सुखरूप सुटका
हिंदुस्थानच्या तीन जहाजांवर अमेरिकेने लागोपाठ केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच आज आणखी एक धक्कादायक घटना घडली. ‘एमएसव्ही विराट-1’ हे हिंदुस्थानी जहाज ओमानच्या समुद्रात बुडाले. ओमान, अमेरिका आणि जवळपासच्या व्यापारी जहाजांनी तातडीने मदत करून जहाजावरील 14 जणांची सुखरूप सुटका केली.
ओमानच्या रास अल हदच्या पूर्व किनारपट्टीपासून 80 नॉटिकल मैलावर आज सकाळी हा अपघात झाला. जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्याने जहाजात पाणी भरू लागले. संकटाची चाहूल लागताच चालक दलाने आपत्कालीन मदतीचा कॉल दिला. इराणशी युद्ध सुरू झाल्यापासून ओमानच्या समुद्रात ठाण मांडून बसलेल्या अमेरिकी नौदलाला हा कॉल मिळताच त्यांनी मदत व बचावकार्य सुरू केले. अमेरिकी नौदलाच्या पी-8 या गस्तीवरील विमानाने बुडणाऱया जहाजाजवळ जीवरक्षक तराफा सोडला. या तराफ्याच्या मदतीने ‘विराट -1’ मधील सर्व कर्मचाऱयांची सुटका करण्यात आली.
वाळवीमुळे अपघात झाल्याचा अंदाज
सागरी तज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जहाज बरेच जुने होते. वाळवी लागल्यामुळे किंवा लाकडी सांगाडय़ाच्या कमकुवत बांधणीमुळे पाणी झिरपून ते बुडाले असावे. अपघाताच्या वेळी परिसरात हलक्या लाटा आणि जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे जहाज बुडण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली असावी, असा प्राथमिक अंदाज सागरीतज्ञांनी वर्तवला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सागरी तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.
Comments are closed.