अदानीविरुद्ध कामगारांचे रणशिंग, शुक्रवारपासून ‘बेस्ट’चा संप
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेला ‘बेस्ट उपक्रम’ अदानी समूहाच्या घशात घालण्याच्या महायुती सरकारच्या षड्यंत्राविरोधात बेस्ट कामगारांनी रणशिंग फुंकले आहे. बेस्टला आर्थिक तोटय़ाच्या गर्तेतून बाहेर काढण्याऐवजी उपक्रमाचे अस्तित्व संपवण्याचा चौफेर प्रयत्न सरकार पातळीवर सुरू आहे. हा डाव उधळण्यासाठी बेस्ट कामगार एकजुटीने पेटून उठले आहेत. ‘अदानी’चे ‘लाड’ करणाऱ्या सरकारने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार, असा निर्वाणीचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत उग्र आंदोलनाची भूमिका मांडली. यावेळी शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेबरोबर बेस्ट उपक्रमातील विविध कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कामगार संघटनांनी बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व आणि कामगारांच्या हिताबाबत चिंता व्यक्त करीत सरकारविरोधात एल्गार पुकारला. आजी-माजी बेस्ट कर्मचारी, वेटलिज कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला वारंवार निवेदने दिली. मात्र सरकारने आश्वासनांवर बोळवण केली, वेळोवेळी दिलेली आश्वासने हवेत विरली. कामगारांच्या प्रश्नांवर टोलवाटोलवी करणाऱ्या महायुती सरकारने मुंबईकरांचा बेस्ट उपक्रम अदानी समूहाला आंदण देण्यासाठी नवनवीन कारस्थाने सुरू केली आहेत. अदानी समूह आणि महायुती सरकारची ‘मिलीभगत’ हाणून पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देणार, असा निर्धार कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अदानीला धारावी डेपोची 11.5 एकर जागा आंदण दिली. त्याऐवजी बेस्टला 6 एकरची जागा कधी देणार, याचा काही थांगपत्ता नाही. बेस्टचे डेपो ‘पीपीपी’ तत्त्वावर अदानी समूहाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. याला समितीचा तीव्र विरोध आहे, असे अॅड. उदय आंबोणकर यांनी जाहीर केले.
कामगारांच्या 12 संघटना एकत्र
बेस्टच्या परिवहन आणि विद्युत या दोन्ही सेवांचे खासगीकरण व कंत्राटीकरण करून धनदांडग्या उद्योजकांचे हित साधले जात आहे, असा आरोप कामगार संघटनांच्या कृती समितीने केला. याच अनुषंगाने आंदोलनाचा एल्गार पुकारत बेस्ट कामगार सेनेसह मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कर्मचारी सेना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट कामगार संघटना, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार क्रांती संघ, बेस्ट बहुजन एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना, बेस्ट उपक्रम निवृत्त कामगार संघटना, लाल बावटा वाहतूक कामगार संघटना या 12 संघटना एकत्र लढण्यासाठी पुढे आल्या आहेत.
बेस्ट कामगार सेनेची आक्रमक भूमिका
अदानी मागेल ते दिले जातेय. मालमत्ता कोणाची आणि ती उद्योगपतीला कोण देऊन टाकतेय? मुळात बेस्टची जबाबदारी ना पालिका घेतेय, ना सरकार. मात्र कोणतीही चर्चा न करता बेस्टच्या मालमत्ता अदानीला आंदण दिल्या जाताहेत. पालिका आणि सरकारला तसा कोणताच अधिकार नाही. बेस्ट कमिटीवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जर प्रशासनाने प्रस्ताव आणला म्हणून तत्काळ मंजुरी देत असतील आणि तोटय़ातील बेस्टला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात नसतील, तर शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचा तीव्र विरोध असेल. याबाबत वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे नेते गौरीशंकर खोत यांनी दिला.
कारण काय?
दक्षिण मुंबईतील बेस्ट ग्राहकांच्या घरी ‘स्मार्ट मीटर’ लावण्याचे कंत्राट अदानी समूहाला दिले. त्यापाठोपाठ धारावीतील काळा किल्ला आगाराची 11.5 एकरची जागा अदानीला आंदण देण्यात आली. याच दरम्यान धारावी, माहीम परिसरातील बेस्टच्या लाखो ग्राहकांच्या घरातील वीजपुरवठ्याचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानीने अर्ज केला आहे. यातून सरकार आणि अदानीची महायुती’ समोर आल्याने कामगारांच्या संतापाचा भडका उडाला आहे.
Comments are closed.