'NEET' परीक्षा संपेपर्यंत 'टेलीग्राम' निलंबित.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे येत्या 21 जूनला ‘नीट-युजी’ ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा होईपर्यंत ‘टेलिग्राम’ या इंटरनेट माध्यमावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. 22 जूनपर्यंत ही बंदी राहील, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) मंगळवारी करण्यात आली आहे. टेलिग्रामच्या उपयोगकर्त्यांना तोवेळपर्यंत होणाऱ्या असुविधेसाठी संस्थेने खेद व्यक्त केला आहे.
टेलिग्राम या इंटरनेट प्लॅटफॉर्मची सर्व अॅप्सही या काळात बंद ठेवली जाणार आहेत. याच माध्यमाचा उपयोग करुन मागच्यावेळी नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका भारतात वेगवेगळ्या स्थानी पाठविण्यात आली होती. तसेच 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत तिची विक्री करण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकाफुटीच्या प्रकरणाचा तपास होत असून अनेकांना अटक झालेली आहे.
प्रश्नपत्रिकाफुटीच्या अफवा
पुन्हा घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटली आहे, अशा प्रकारच्या अफवाही टेलिग्राम या माध्यमावरुन पसरविण्यात येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ व्हावा या हेतूने अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळेही या माध्यमावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप काही राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी केला असून तो धादांत खोटा आहे. केवळ राजकीय हेतूने असे आरोप करण्यात येत आहेत. एनटीएने यावेळी प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली असून चिंता नको, असे आवाहनही करण्यात आले.
गुप्तता राखण्यासाठी अनेक उपाय
यावेळी प्रश्नपत्रिका गुप्त राखण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. जे प्राध्यापक प्रश्नपत्रिका तयार करणार आहेत, त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या वेळेपासून परीक्षा पूर्ण होईपर्यंत एकांतात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांना मोबाईल फोन किंवा संपर्काचे अन्य कोणतेही साधन स्वत:जवळ ठेवण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. त्यांची पूर्ण तपासणी करुन त्यांना ‘विलगीकरणा’त ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी निवडलेले प्रश्न यामुळे गुप्त राहतील. तसेच परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहचविण्यासाठी यावेळी भारतीय वायुदलाच्या विमानांचे आणि हेलिकॉप्टर्सचे साहाय्य घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळेआधी अगदी थोडा काळ आधी या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहचविल्या जातील, अशी माहिती आहे.
ntech पोर्टल
21 जूनच्या नीटची प्रश्नपत्रिका फुटली असल्याच्या अफवांची माहिती घेण्यासाठी एनटीएने एका पोर्टलचा प्रारंभ केला आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा उठविण्यात आली असेल, तर त्यासंबंधी या पोर्टलवर माहिती द्यावी. माहिती मिळताच कृती केली जाईल, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले. प्रश्नपत्रिका फुटणार नाही, यावर पूर्ण विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. त्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत करावे, अशीही विनंती एनटीएने विद्यार्थ्यांना केली आहे.
Comments are closed.