‘भारतीय टोमाहॉक’ला अखेर यश – TMarathiNews

अपयशांच्या मालिकेनंतर झाले यशस्वी परीक्षण

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतनिर्मित दीर्घ पल्ल्याच्या भूमीलक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण अखेर यशस्वी झाले आहे. यापूर्वी अनेकदा या क्षेपणास्त्राची परीक्षणे अयशस्वी झाली आहेत. ‘निर्भय’ या नावाने या क्षेपणास्त्राची परीक्षणे करण्यात येत होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.

सोमवारी (15 जून 2026) ओडीशातील चांदीपूर प्रक्षेपण केंद्रावर या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. त्याचे ‘निर्भय’ हे नाव आता बदलण्यात आले आहे. त्याचे नवे नामकरण अद्याप व्हायचे आहे. मात्र, आता या क्षेपणास्त्रात पूर्वी राहून गेलेले सर्व दोष दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे परीक्षण सर्व निकषांवर यशस्वी ठरलेले आहे, अशी माहिती संस्थेने दिली आहे.

1000 किलोमीटरवर लक्ष्यभेद

परीक्षणाच्या वेळी या क्षेपणास्त्राने 1 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या लक्ष्याचा अचूक भेद केला. यावेळी भारताच्या तीन्ही सेनादलांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी परीक्षण यशस्वी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. हे क्षेपणास्त्र, अमेरिकेने विकसीत केलेल्या ‘टोमाहॉक’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्रासारखे आहे. त्यामुळे त्याला ‘भारतीय टोमाहॉक क्षेपणास्त्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

रडारवर न दिसल्याची क्षमता

या क्षेपणास्त्राचा वेग जवळपास ध्वनीच्या वेगाइतका आहे. तसेच ते कमी उंचीवरुन लक्ष्यभेद करीत असल्याने ते शत्रूच्या रडावर दिसत नाही. त्यामुळे त्याच्या मार्गात शत्रूचा अडथळा किंवा हस्तक्षेप होऊ शकत नाही. ते 1 हजार तसेच 1 हजार पेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यांचा अचूक वेध घेऊन त्यांना नष्ट करु शकते. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 500 किलोग्रॅम वजनाची स्फोटके वाहून नेली जाऊ शकतात. या क्षेपणास्त्रामुळे भारताचे सामरीक सामर्ध्य वाढणार आहे.

पाकिस्तान-चीनला प्रत्युत्तर

पाकिस्तानकडे 900 किलोमीटर पल्ल्याचे ‘बाबर’ हे क्रूझ क्षेपणास्त्र 2010 पासून आहे. चीनकडेही अनेक वर्षांपासून अनेक प्रकारची क्रूझ क्षेपणास्त्रे असून ती अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. अमेरिकेच्या एका स्फोट न झालेल्या टोमाहॉक क्षेपणास्त्रावरुन पाकिस्तानने चीनच्या संपूर्ण तांत्रिक सहकार्याने बाबर हे क्षेपणास्त्र बनविले. भारतालाही अशाच क्षेपणास्त्राची आवश्यकता होती. ती या क्षेपणास्त्राने पूर्ण होण्याची शक्यता आहे. इतरही अनेक क्षेपणास्त्रे भारत विकसीत करत आहे.

Comments are closed.