गिलचे कर्णधार म्हणून पहिले आणि किशनचे 2022 नंतर पहिले शतक! जिवलग मित्रांनी लखनऊमध्ये अफगाणिस्तानला चांगलेच धूतले

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज (बुधवार, 17 जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन यांनी फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना सादर केला. गिलने भारताचा वनडे कर्णधार म्हणून आपले पहिले शतक पूर्ण केले, तर इशान किशनने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध केलेल्या ऐतिहासिक द्विशतकानंतर आपले पहिले वनडे शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याचे वनडेमध्ये जबरदस्त पुनरागमन झाले.

गिलने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत अवघ्या 77 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, हे त्याचे वनडेमधील 9 वे शतक आहे. तसेच त्याचे हे भारताचा कर्णधार म्हणून 7 वे शतक ठरले आहे. त्याने भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या (पुरुष) यादीत राहुल द्रविडला मागे टाकले. दुसऱ्या बाजूला किशनही चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी गोलंदाजी अधिक अचूक केल्यामुळे गिलने काही काळासाठी आपला खेळ बदलला, ज्यामुळे किशनला आक्रमक भूमिका घेण्याची संधी मिळाली. त्याने हशमतुल्ला शाहिदी, गझनफर आणि रशीद खान या सर्वांवर हल्ला चढवत धावांची गती वाढवली.

किशनने 52 चेंडूंत अर्धशतक आणि 71 चेंडूंतच शतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या 50 धावा केवळ 19 चेंडूंतच केल्या. यावरून दोन्ही मित्रांनी अफगाणिस्तानला चांगलाच त्रास दिल्याचे दिसते. एकाच डावात 80 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन भारतीय फलंदाजांनी वनडे शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ होती आणि वनडे क्रिकेटच्या इतिहासातील एकूण अशी ही केवळ आठवी घटना आहे. या सामन्यात गिल 154 (110) धावा आणि किशन 125 (79) धावा करत बाद झाले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 224(140) धावांची भागीदारी केली.

किशनने त्याच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे वनडे शतक होते आणि डिसेंबर 2022 मध्ये चट्टोग्राम येथे बांगलादेशविरुद्ध केलेल्या विक्रमी द्विशतकानंतरचे हे त्याचे पहिले शतक होते.

Comments are closed.