सायबर फसवणूक करणारे: 'परजीवी'

सर्वोच्च न्यायालायच्या खंडपीठाची टिप्पणी : आरोपीला जामीन नाकारला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका सायबर फसवणूक आरोपीचा जामीन स्पष्टपणे नाकारला. इतकेच नाही तर, त्याचा जामीन अर्ज फेटाळताना, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अशा गुन्हेगारांबद्दल अत्यंत गंभीर टिप्पणी केली. “तुम्ही परजीवी आहात…समाजाच्या हितासाठी अशा लोकांना तुरुंगातच डांबले पाहिजे.” असे महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बुधवारी एका खटल्याची सुनावणी करताना सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला खडे बोल सुनावले. सायबर गुन्हेगार हे परजीवी आहेत, ते लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करतात आणि त्यांना पकडणे कठीण असते. असे गुन्हेगार तुरुंगातच राहावेत, हे समाजाच्या हिताचे आहे, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर कठोर टीका केली. …असे गुन्हेगार देशभरातील लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करतात, असे सायबर गुन्हेगारी प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.

सायबर फसवणुकीवर कडक संदेश

सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की, सायबर गुन्हेगार अनेकदा एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये कार्यरत असतात. यामुळे सायबर गुन्हे शोधणे आणि त्यांचा तपास करणे अधिकच कठीण होते. त्यामुळे अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सूचित केले. गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एखाद्या खटल्यावर निकाल देण्यापूर्वी इतकी कठोर भाषा वापरली आहे.

तुरुंगात ठेवणेच उचित….

आम्हाला सायबर गुन्हेगारांबाबत खूप कठोर भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही (सायबर गुन्हेगार) परजीवी आहात… जे गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करतात. तुमचे बळी नेहमी देशभरातील भारतीयच असतात. तुम्ही तामिळनाडूमध्ये कोणाची फसवणूक करता आणि मग जम्मूमध्ये जाता… तुम्हाला तुरुंगात ठेवण्यातच समाजाचे हित आहे.

– सरन्यायाधीश सूर्य कांत

Comments are closed.