सागरी मार्ग आणि खलाश सुरक्षित असले पाहिजेत!

पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-7’ परिषदेत आवाहन

वृत्तसंस्था/ एव्हियन (फ्रान्स)

व्यापारासाठी समुद्री मार्ग अत्यावश्यक आल्याने त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाणे आवश्यक आहे. तसेच नौकांवरील नाविकांनाही निर्भय होऊन काम करता आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित ‘जी-7’ शिखर परिषदेत भाषण करताना केले आहे. या परिषदेत भारताला आमंत्रित देश म्हणून बोलाविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका मालवाहक नौकेवर झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाविकांच्या सुरक्षेसंबंधी जगाने सतर्क राहण्याची ही सूचना केलेली आहे.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे इराण नजीक असणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात आता शांतता करार निश्चित झाल्यामुळे या सामुद्रधुनीतून वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, इराण ही सामुद्रधुनी केव्हाही बंद करु शकतो, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने बुधवारी दिलेला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे आवाहन जगाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

शांतता प्रयत्नांचे स्वागत

पश्चिम आशियात सध्या विविध शांतता प्रस्ताव समोर येत आहेत. कोणतीही समस्या युद्ध करुन सुटत नाही, ही भारताची भूमिका आहे. शांततेच्या मार्गाने चर्चा करुनच कोणत्याही समस्येवर तोडगा काढला पाहिजे. त्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यांचे मी भारताच्या वतीने मनापासून स्वागत करतो. विशेषत: ज्या सागरी मार्गांवर जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ते मार्ग वाहतुकीसाठी मुक्त रहावयास हवेत. ते तसे राहतील, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने सुनिश्चित करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अनेक मुद्दे जोडलेले

आज ऊर्जा, अन्न, आरोग्य आणि सायबर सुरक्षा यांच्यासारखे महत्वाचे आणि् जीवनावश्यक मुद्दे जागतिक स्तरावर एकमेकांशी जोडले गेले आहेत. आजच्या जगातील लोक वाहतूक, आवश्यक माहिती, मोठी गुंतवणूक आणि नवी उद्योजकता या साधनांच्या माध्यमातून आज जग जोडले गेले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जगातील प्रत्येक देशाने अन्य देशांना सहकार्य करावयास हवे. आज आंतरराष्ट्रीय भागीदारीला कधी नव्हे, इतके महत्व आले आहे. सर्व देशांमध्ये परस्पर विश्वास असेल, तर ही भागीदारी यशस्वी होत असते. त्यामुळे सर्वांनी त्यादृष्टीने प्रयत्नशील राहावे, असे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

ग्लोबल साऊथची भूमिका महत्वाची

सध्याच्या परिस्थितीत जगात ग्लोबल साऊथ या गटाची भूमिका महत्वाची ठरते. विकसनशील देश विकसीत देशांकडून केवळ आर्थिक आणि तांत्रिक साहाय्याची अपेक्षा करत नाहीत, तर जगाच्या विकासात विकसनशील देशांनाही महत्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळावी, असे त्यांना वाटते. त्यांच्या या भावनेचा आदर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

Comments are closed.