आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार! राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘शिवसेनेने राजाभाऊ वाजे यांना आमदार आणि खासदार केले. त्यात आम्ही समाधानी आहोत. आम्ही व्यावसायिक राजकारणी नसल्याने शेवटपर्यंत शिवसेनेतच राहू,’ अशी स्पष्ट भूमिका नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे यांनी आज मांडली.

सिन्नर येथील निवासस्थानी बुधवारी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ‘कायमस्वरूपी शिवसेनेत राहणार’, असा शब्द राजाभाऊंनी शिवसेना प्रवेशावेळी शिवबंधन बांधतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. दिलेला शब्द पाळण्याची परीक्षा आता राजाभाऊ देत आहेत. आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, सामाजिक कार्यातून आम्हाला जे मिळाले त्यात समाधानी आहोत. शिवसेनेने राजाभाऊंना 2014 साली आमदार केले, 2024 साली खासदार केले. जे मिळायचे ते भरपूर मिळाले,’ अशी कृतज्ञताही प्रकाशभाऊ वाजे यांनी यावेळी व्यक्त केली.
शिंदे गटाचे दोन लोक माझ्याकडे आले होते!

‘शिंदे गटाच्या ठाण्यातील दोन व्यक्ती 14 एप्रिल रोजी मला घरी येऊन भेटल्या. मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी देऊ. सत्ता नसली की निधी मिळत नाही. शिंदे गटाकडे या, अशी ऑफर त्यांनी दिली होती. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत, त्यांची साथ सोडणार नाही. माझा मुलगा मला विचारल्याशिवाय काहीही करीत नाही, करणारही नाही. त्याची पुढील जबाबदारी तुम्ही घेऊ नका, वडील म्हणून ती जबाबदारी माझी आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं, असे प्रकाशभाऊ वाजे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो

मला भेटण्याआधी ते दोघे राजाभाऊंनाही भेटले होते. मी जे बोललो, तेच राजाभाऊंनी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं, असंही प्रकाशभाऊ यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर मी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, असं त्यांना सांगितलं होतं. आमचा तो निर्धार कायम राहणार आहे,’ असंही प्रकाशभाऊ वाजे यांनी ठामपणे सांगितलं.

Comments are closed.