ममता दीदींचा सहकारी उदयन गुहा याला अटक.
शुभेंदु अधिकारी यांच्यावर हल्ल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सत्ता गमवावी लागल्यावर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. याच क्रमात बुधवारी पोलिसांनी राज्याचे माजी मंत्री उदयन गुहा यांना अटक केली आहे. माजी आमदाराला खंडणीवसुलीच्या आरोपाखाली कूचबिहार पोलिसांनी अटक केली आहे.
सरकारी रुग्णालयात मुलांसाठी एक यूनिट निर्माण करण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये जमविले होते, परंतु ही रक्कम त्यांनी हडपली होती असा आरोप आहे. उदयन यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे 20-25 कोटी रुपये जमविले होते, तर प्रत्यक्षात त्यांनी काम केवळ 40-50 लाख रुपयांचे करविले होते अशी तक्रार रुपम साहा यांनी केली होती.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा आरोपही उदयन गुहा यांच्यावर झाला होता. उदयन यांना ममता सरकार वाचवत असल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या अधिकारी यांनी केला होता. उदयन यांच्या समर्थकांनी कूचबिहारच्या खागडाबाडी क्षेत्रात अधिकारी यांच्या वाहनावर हल्ला केला होता. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदविला असला तरीही गुन्ह्यातून उदयन गुहा यांचे नाव वगळले होते.
उच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण
या प्रकरणी शुभेंदु अधिकारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलीस उदयन गुहा यांना याप्रकरणी वाचवू पाहत असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला होता. यानंतर उच्च न्यायालयाने दोन्ही एफआयआरमध्ये फरक का आहे हे स्पष्ट करण्याचा निर्देश पोलिसांना दिला होता.
कोण आहेत उदयन गुहा?
उदयन गुहा हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहेत अणि कूचबिहार जिल्ह्याच्या दिनहाटा क्षेत्रात त्यांची मजबूत राजकीय पकड असल्याचे मानले जाते. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. उदयन गुहा हे त्यापूर्वी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकमध्ये कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उदयन गुहा हे दिनहाटा मतदारसंघाचे अनेकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर बंगालच्या राजकारणात प्रभावशाली नेते असलेले गुहा हे ममता सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.
Comments are closed.