एनईईटीच्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘नीट’ परीक्षेसंबंधीचा वाद आणि पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राजधानी दिल्लीतील पालम परिसरात परीक्षेची तयारी करणाऱ्या रेणू मीणा नामक एका विद्यार्थिनीने कथितरित्या आत्महत्या केली आहे. रेणूचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील अलवर जिह्यातील आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांचा वाढता दबाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 14 ‘नीट’ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू या विद्यार्थिनीने 3 मे रोजी नीट परीक्षा दिली होती. त्यानंतर परीक्षा रद्द झाल्यामुळे ती तणावाखाली होती. 13 जून रोजी सासऱ्यांच्या निधनानंतर रेणूचे वडील तिच्या सासरच्या घरी गेले होते. घटनेच्या वेळी रेणू घरी एकटीच होती. तिने 13 जूनच्या संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यावरून ती मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे सूचित होते. सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण करता न आल्याबद्दल माफी मागितली आहे.

चालू आठवड्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राजस्थानमधील सीकर जिह्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याचे नाव उमेश माळी होते.

Comments are closed.