माजी पंतप्रधानांचा मुलगा 7.8 कोटींच्या सायबर फसवणुकीला बळी पडला आहे.

बनावट ऑनलाईन मेसेजिंग अॅप्लिकेशनद्वारे डल्ला

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सायबर फसवणूक करणाऱ्यांनी माजी राज्यसभा सदस्य नरेश गुजराल असल्याचे भासवून एका ऑनलाईन मेसेजिंग अॅप्लिकेशनद्वारे त्यांच्या कंपनीच्या आर्थिक विभागातील कर्मचाऱ्यांची 7.8 कोटी रुपयांची फसवणूक केली, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. नरेश गुजराल (78) हे 1997 ते 1998 या काळात भारताचे 12 वे पंतप्रधान राहिलेल्या इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे ई-एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही फसवणूक 12 ते 16 जून दरम्यान झाली. या काळात फसवणूक करणाऱ्यांनी नरेश गुजराल यांचा डिस्प्ले पिक्चर (डीपी) वापरून एका ऑनलाईन मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर खाते तयार केले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्यावसायिक गरजेचा हवाला देत, त्यांच्या एका कर्मचाऱ्याला संदेश पाठवून, रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंटद्वारे (आरटीजीएस) एका विशिष्ट बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.

हे निर्देश खरे आहेत असे समजून, त्या कर्मचाऱ्याने चार दिवसांत चार वेळा ‘आरटीजीएस’द्वारे त्या विशिष्ट खात्यात 7.8 कोटी रुपये हस्तांतरित केले. सदर कर्मचारी गुजराल यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळतो. 16 जून रोजी ही फसवणूक उघडकीस आली. गुजराल यांच्या मुलीच्या हे व्यवहार लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ आपल्या वडिलांकडून याची खात्री करून घेतली. नरेश गुजराल यांनी असे कोणतेही निर्देश दिल्याचे नाकारत पैशांच्या हस्तांतरणाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कुटुंब आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी जलद कारवाई करत फसवणुकीने हडपलेल्या रकमेपैकी सुमारे 4 कोटी रुपये गोठवले. पोलीस आता या पैशांच्या ठिकाणाचा तपास करत आहेत.

Comments are closed.