इबोलाचे थैमान! आठवडाभरात 40 टक्के रुग्ण वाढले, मृतांचा आकडा 200 पार; आरोग्य यंत्रणा अलर्टवर
कोरोनाच्या महाभयंकर महामारीनंतर आता इबोला या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूप्रमाणे हा नवीन विषाणू जगभरात पसरणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आफ्रिका खंडातील काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला विषाणूच्या उद्रेकाने अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. महिन्याभरात इबोलामुळे 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Africa CDC) ने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 30 हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे.
आफ्रिका सीडीसीचे वैद्यकीय महामारीतज्ज्ञ डॉ. वेसाम मानकुला यांनी या विषाणूचे वास्तव सांगितले आहे. आतापर्यंत इबोलाच्या 894 प्रकरणांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. 2000 साली युगांडामध्ये झालेल्या इबोलाच्या उद्रेकाच्या तुलनेत सध्याची परिस्थिती तीन पटीने अधिक गंभीर आहे. त्यावेळी 281 रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत 38 टक्के वाढ झाली असून, हा प्रादुर्भाव आता पूर्व काँगोमधील 32 क्षेत्रांमध्ये पसरला आहे. 15 मे रोजी या विषाणूची अधिकृत नोंद झाली असली, तरी काही आठवडे आधीच या विषाणूचा प्रसार सुरू झाल्याचा संशय असल्याने प्रत्यक्ष रुग्णांचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.
इबोलाचा हा उद्रेक ‘बुंदीबुग्यो’ नावाच्या दुर्मिळ विषाणूमुळे झाला आहे. मात्र, यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची लस किंवा निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. काँगोमध्ये यापूर्वी ‘झायरे’ (Zaire) या विषाणूने डोके वर काढले होते, ज्याच्या उपचारांसाठी लस उपलब्ध आहे. या दुर्मिळ विषाणूशी लढण्यासाठी आता ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’सारख्या प्रायोगिक उपचारांवर काम सुरू आहे.
इबोला या साथीचा मुख्य केंद्रबिंदू काँगोचा पूर्व प्रांत ‘इतुरी’ हा असून, एकूण रुग्णांपैकी 90% पेक्षा जास्त रुग्ण याच भागात आहेत. हा विषाणू आता शेजारील उत्तर किवू, दक्षिण किवू प्रांत आणि थेट युगांडाच्या सीमेपलीकडे पोहोचला आहे. युगांडात 19 रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. युनायटेड नेशन्सच्या (UN) मानवतावादी कार्यालयाच्या निवेदनानुसार, इतुरी प्रांतातील अनेक वर्षांच्या अंतर्गत संघर्षामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. येथील घनदाट जंगले, खराब रस्ते आणि खनिजांच्या खाणींमध्ये सतत स्थलांतर करणाऱ्या मजुरांमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. सध्या आवश्यक असलेल्या ३५ हजार संभाव्य रुग्णांपैकी केवळ 4 हजार लोकांचाच शोध घेणे प्रशासनाला शक्य झाले आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच आफ्रिका सीडीसीला निधी आणि मनुष्यबळाच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या साथीविरुद्ध लढण्यासाठी 900 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात केवळ 90 दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच, या संकटाचा सामना करण्यासाठी 540 तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ 84 कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत आहेत. “आंतरराष्ट्रीय भागीदार आणि सदस्य देशांनी दिलेली आश्वासने लवकर पूर्ण करून निधी तातडीने जारी करावा, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात आणता येईल,” अशी अपेक्षा डॉ. मानकुला यांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.