वैभव सूर्यवंशीवर श्रीलंकेत कडक कारवाई; बीसीसीआयने अफवा दूर सारत भूमिका केली स्पष्ट
भरमैदानात वैभव सूर्यवंशीने राडा केल्याचे सर्वांनी पाहिले आणि याप्रकरणी आता त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर बीसीसीआयबाबत काही अफवा पसरल्या होत्या. पण या कारवाईनंतर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई केली…
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ संघ यांच्यात सोमवारी सामना झाला. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विशेन हालांबागे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे वैभव आणि विशेन यांच्यावर सामना शुल्काच्या 50 टक्के दंडाची कारवाई करण्यात आली आहे. फक्त एवढेच नाही तर भारताचा कर्णधार तिलक वर्मावर सामना शुल्काच्या 30 टक्के दंडाची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेलावरही 20 टक्के दंडाची शिफारस सामनाधिकारी प्रदीप जयप्रकाश यांनी केली आहे.
कोणती अफवा पसरली होती…
वैभवला बेशिस्त वर्तन केल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी दंड ठोठावला. पण वैभवने जे कृत्य केले ते क्रिकेटला शोभणारे नव्हते. पण तरीही बीसीसीआय त्याला पाठीशी घालत असल्याचे म्हटले जात होते. वैभववर झालेल्या कारवाईच्या विरोधात बीसीसीआय दाद मागणार असल्याची अफवा पसरली होती.
बीसीसीआयने स्पष्ट केली भूमिका…
याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, ‘वैभववर जी कारवाई केली आहे, ती सामनाधिकारी यांनी केली आहे. सामनाधिकारी यांना जे नियमानुसार योग्य वाटले ते त्यांनी केले आहे आणि तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही बीसीसीआय म्हणून त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्यांच्याविरोधात आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. त्यामुळे या निर्णयात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही.’
Comments are closed.