इस्रायलने धुडकावला शांतता करार; लेबनॉनवर भीषण हल्ला, 18 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिकेत शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये इस्रायलने लेबनॉनवर मोठा हल्ला केला. त्यात हिजबुल्लाच्या १८ बंडखोरांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाने दिलेल्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या ४ सैनिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यांनंतर अमेरिका आणि इराणमध्ये स्वित्झर्लंडमध्ये होणारी चर्चा स्थगित करण्यात आली आहे.

शांतता करारातील अटींनुसार इस्रायलला लेबनॉनवरील हल्ले थांबवायचे होते. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही अट मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच इस्रायलने हल्ले केले. इस्रायलच्या सैन्याने केलेल्या दाव्यानुसार, गुरुवारी रात्रीपासून दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमध्ये ८० पेक्षा जास्त ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर हिजबुल्लाने दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले.

इराण आणि अमेरिकेत स्वित्झर्लंडमध्ये आज शांतता करारानंतर चर्चा होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली. यामागे लेबनॉनवरील हल्ल्यांचे कारण देण्यात आले. अमेरिकेने सर्वप्रथम लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची हमी द्यावी, त्यानंतरच पुढील चर्चा होईल, अशी भूमिका इराणने घेतली आहे. मात्र इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून सैन्य माघारी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

करारानंतर २५ जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी

इराण आणि अमेरिकेतील करारानंतर गुरुवारपासून २५ व्यावसायिक जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. १८ एप्रिलनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जहाजांनी हा मार्ग वापरला. या मार्गातून जाणाऱ्या जहाजांची संख्या वाढत जाणार आहे.

Comments are closed.