Ratnagiri News – बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार; गोळप व फणसोपमधील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनद्वारे रत्नागिरी तालुक्यातील गोळप व फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे या उद्देशाने मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झीक्युटीव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.बालविकासाची पायाभरणी अंगणवाडीतूनच होत असल्याची जाणीव ठेवून या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर, सुधारित पायाभूत सुविधा आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील बालकांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याच ध्येयाचा एक भाग म्हणून गोळप आणि फणसोप येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, स्थानिक समुदायाकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत गोळप गावातील रनपार, गुरववाडी, गोळप सडा आणि शिरंबाडवाडी तसेच फणसोप गावातील फणसोप (मराठी) आणि मागलाड येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतींची दुरुस्ती, बोलक्या भिंती, रंगकाम, स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गोळप येथील अंगणवाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमास अतिथी म्हणून रत्नागिरी येथील अॅडव्होकेट, समाजसेविका व मुकुल माधव फाऊंडेशनच्या सल्लागार रुची महाजनी व अॅड. गौरव महाजनी हे मान्यवर उपस्थित होते. यासह गोळप गावातील सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, माजी सरपंच उमंग साळवी,कंत्राटदार सुयोग आंबेरकर व ओंकार भेकरे यांच्यासह मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने रामबाबू सांका संचालक तांत्रिक विभाग रामबापू सांका, व्यवस्थापक सागर चिवटे.एचआर प्रमुख नंदकिशोर शिंपी,अमित घोरपडे, विकास कुरतडकर आणि आशिष आठवले, तर मुकुल माधव फाऊंडेशनकडून शुभम भेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे आणि ग्रामीण भागातील बालविकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
Comments are closed.