हार्दिक पंड्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर! विराट कोहलीच्या फिटनेसबाबतही अपडेट आली समोर
सध्या भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० असा विजयी आघाडीवर असून तिसरा सामना आज (शनिवार, २० जून) चेन्नईमध्ये खेळला जात आहे. त्यानंतर भारत युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यावर जाणार आहे, ज्यामध्ये आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये सामने खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आणि त्यानंतर इंग्लंडला रवाना होईल, जेथे टी२० आणि वनडे मालिकेचे आयोजन आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने युकेच्या दौऱ्यासाठी टी२० संघांची घोषणा केली आहे, मात्र वनडेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नाही. त्याआधीच संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि हार्दिक पंड्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याची या मालिकेसाठी निवड होणार नाही. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या हार्दिकचा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतही समावेश होता, मात्र फिटनेसच्या समस्यांमुळे तो या मालिकेला मुकला आहे. आता तर तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर झाला आहे.
दुसरीकडे विराट कोहली आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्याला गुजरात टायटन्सविरुद्ध हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, त्यामुळे तो पण अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला. आता तो दुखापतीतून सावरत असून त्याची २२ जून रोजी फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला जाणार आहे.
तसेच भारताच्या वनडे संघात केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड होण्यास फिट आहे. तसा अहवाल निवड समितीकडे पाठवण्यात आला आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही आयपीएल २०२६ दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. आता तो पूर्णपणे फिट असून अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत आहे.
Comments are closed.