आता प्रतीक्षा संपली! मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची चाहूल; दमदार बरसण्याची शक्यता

यंदा पावसाने सर्वांना खूप प्रतीक्षा करायला लावली आहे. जून महिना अर्धा उलटून गेला तरीही पावसाच्या सरी बरसल्याच नाहीत. मात्र, आता हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. कोकणसह, मुंबईत मान्सूनच्या आगमनाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंगळवार दिनांक 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल रखडली होती. मात्र, आता मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पूरक वातावरण असून 23 जूनपासून कोकण, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार आहेत. याबाबत ज्येष्ठ हवामानत तज्ञ के. एस. होसाळीवर यांनी माहिती दिली आहे.

होसाळीवर यांनी एक्सवर पोस्ट शेअर पावसाची चाहूल असून सर्वांना मॉन्सूनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,मुंबई आणि महाराष्ट्रात जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही आपण उन्हाचा तडाखा अनुभवत असतानाच, एक दिलासादायक बातमी आहे… येत्या आठवड्यात, साधारणपणे २२-२३ तारखेपासून, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढून २४ ते २६ जून दरम्यान तो उत्तर कोकण (मुंबईसह) आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचू शकतो.

हवामान अंदाजाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जूनच्या अखेरीपर्यंत सुरू राहू शकतो. मात्र, मुंबईसाठी पाणीसाठ्यात किती वाढ होईल हा एक मोठा प्रश्न आहे, कारण सध्या हा साठा केवळ ८-९ टक्क्यांवर आला आहे. कृपया पाण्याची बचत करा; कारण हा हंगाम ‘एल निनो’च्या (El Niño) प्रभावाखाली आहे, ज्याचा मान्सूनच्या स्वरूपावर आधीच विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे कृपया पाण्याचा अपव्यय टाळा. पाणी कसे वाचवायचे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. सर्व निचरा व्यवस्था (ड्रेनेज) स्वच्छ केली गेली असेल आणि पूरस्थिती उद्भवणार नाही, अशी आशा करूया.

पुढील माहितीची वाट पाहूया, पण आता छत्री तुमच्या ऑफिस बॅगेचा एक भाग बनू शकते. या हंगामात डासांमार्फत पसरणारे आजार (उदा. मलेरिया) उद्भवू शकतात… त्यामुळे स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. मान्सूनच्या आगामी हंगामासाठी शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.