Amit Shah in Kolhapur “देशातील घुसखोरांना शोधून बाहेर काढणार” केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची कोल्हापूरची सभा या मुद्द्यांवर गाजली

प्रतिनिधी कोल्हापूर
बंगालच्या जनतेने भाजपच्या हाती सत्ता देऊन आशिर्वाद दिला आहे. आता फक्त बंगालमध्येच घुसखोरांना रोखले जाईल, असे नव्हे तर देशाच्या सर्वच सीमांमधून घुसखोरी रोखली जाईल. उद्धवजी, काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसला आहात, तर कान उघडे ठेवून ऐका. हा देश धर्मशाळा होणार नाही तर या देशात जो जन्मला तोच येथे राहील. घुसखोरांना शोधून शोधून बाहेर काढू, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

अंबाबाई कॉरीडॉरच्या निर्मितीला सुरूवात करून महाराष्ट्र सरकारने राज्यात धर्माचे शासन आणि संस्कृतीच्या जागरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. भविष्यात अंबाबाई शक्तीस्थळ लाखो भाविकांसाठी प्रेरणास्त्रोत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंबाबाई मंदिरात विकास आराखड्यांतर्गत 1500 कोटींच्या कामाचे भूमीपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी अंबाबाई मंदिरात अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1500 कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित कृतज्ञता सोहळा, धन्यवाद सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमात महापौर रूपाराणी निकम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची प्रत गृहमंत्री शहा यांना देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, मंत्री संजय सावकारे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आशिष शेलार, मंत्री माधुरी मिसाळ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडीक भाजपयुवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

तुझ्या आवाजात ताकद नाही…
प्रारंभीच केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा केली. पण उपस्थितांकडून या घोषणेला जोर कमी मिळाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरकरांच्या आवाजाला काय झालेय, असा प्रश्न करत ‘आपके आवाज में दम नही,’ असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली, अन् त्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

आता फक्त एकच शिवसेना उरली आहे…
अमित शहा म्हणाले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या कुशीत बसले आहेत. ज्येष्ठ नेते पवारही त्यांच्याकडे आहेत. पण कॉग्रेसमुळेच त्यांचे नुकसान होत आहे. अब उद्धवजी के पास कुछ रहा ही नही. अब तक शिवसेना शिंदे गट असे म्हटले जात होते, पण आता शिंदे गट नाही तर ती एकच शिवसेना बनली आहे.

कोल्हापूरची अंबाबाई हे ऊर्जाकेंद्र

कोल्हापूरची अंबाबाई शक्तीस्थळ आहे, लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात, त्यांच्यासाठी अंबाबाई मंदिर कॉरीडॉर निर्मितीचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होताच भक्तीच्या महासागराचे दर्शन येथे घडणार आहे. 1500 कोटींच्या या आराखड्यातून 28 हजार 58 चौरस स्क्वेअर मीटरचा कॉरीडार होत आहे. हे काम पूर्ण होताच जगभरातील भाविकांसाठी हे ऊर्जा केंद्र बनेल.

अंबाबाई कॉरीडॉर भक्तीच्या पुनर्जागरणाचा प्रेरणास्त्रोत
अंबाबाई कॉरीडॉरमध्ये एआय आधारीत कॅमेऱ्याने मंदिर आणि भाविकांची सुरक्षा निश्चित केली आहे. एलईडी गॅलरी, हेरिटेज वॉल, भाविकांसाठी हॉल, अन्नछत्र, अंबाबाई मंदिराचा इतिहास मांडणारे प्रदर्शन समाविष्ट आहे. हा कॉरिडॉर लाखो भाविकांसाठी भक्तीच्या पुनर्जागरणाचा प्रेरणास्त्रोत बनेल, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात 12 वर्षांत जी कामे अशक्य मानली. ती कामे पूर्ण केली आहेत. रामजन्मभूमी आंदोलनावेळी लहान होतो. पण तेव्हापासून मंदिर होणार नाही, असेच ऐकत होतो. आम्हालाही हयातीत राम मंदिर पहायला मिळेल, असे वाटत नव्हते. पण 2014 ला केंद्रात भाजप सरकार आले, अन् राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. आता काशी विश्वनाथाचा कॉरीडॉर, केदारनाथ, सोमनाथ, बद्रीनाथ त्याला जोडूनच कामाख्या मंदिर असा कॉरीडॉर बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार विकास आणि वारसाही ही संकल्पना घेऊन अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिराची पुनर्निमिती करत आहे, ही गौरवाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत, अन् त्यांचा 12 वर्षाचा काळ हा संस्कृतीची पुनर्स्थापना, सुरक्षित भारत आणि सशक्त भारत म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. मोंदींच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आता विकास आणि वारसा संकल्पना राबवत संस्कृतीचे संवर्धन, सीमांचे संरक्षण केले जात असल्याचे शहा यांनी सांगितले.

सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी 'विकास आणि वारसा' हा मंत्र : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरला महाशक्तीचे मंदिर आहे. सारी शक्ती तिथे आहे. त्याकडे लक्ष द्या, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार सांगत होते. त्यांच्या आग्रहावरून सरकारने अंबाबाई मंदिर संवर्धन आणि विकास आराखड्याचे काम हाती घेतले आहे, त्याचे भूमिपुजन त्यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकास भी विरासत भी’चा मंत्र दिला अन् त्यातून अंबाबाई मंदिर विकास आराखडा पुढे आला.

शिवकालानंतर मंदिरांचा विनाश होत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांच्या पुनरूस्थानाचे काम हाती घेतले. त्यानंतर हीच पुनरूत्थानाची परंपरा मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. सांस्कृतिक पुनर्जागरण देशभर होत आहे. आपल्या आराध्य दैवतांच्या आशिर्वादातून पुनरूस्थानाचे कार्य सुरू आहे.
अंबाबाईच्या दर्शनाला वर्षभरात 50 लाखांहून अधिक भाविक येतात. पण तिरूपतीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही, असे म्हटले जाते. अंबाबाईच्या या वरदानातूनच पुढील 100 वर्षे लक्षात राहील, असे मंदिर आराखड्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांनी अनेकदा घेतले अंबाबाईचे दर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांना करवीर निवासिनी अंबाबाईचा नेहमीच आशिर्वाद लाभला. छत्रपती शिवरायांनी अनेकदा देवीचे दर्शन घेतले. याच्या नोंदीही शिवकालीन इतिहासात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या अंबाबाई विकास कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरीडॉर करत आहोत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने हे काम सुरू झाले आहे. जोतिबा मंदिर आराखडा सुरू झाला आहे. भविष्यात वाडी रत्नागिरी तीथक्षेत्र हिरवेगार दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने यांनी स्वागत केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही भाषण झाले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आभार मानले.

Comments are closed.