पाऊलखुणा – सौंदर्याचा महाल बांते स्त्राय मंदिर

>> आशुतोष बापट, [email protected]

बांते स्त्राय या शब्दाचा अर्थ होतो स्त्रियांचा महाल किंवा सौंदर्याचा महाल, परंतु हे नाव बरेच नंतर पडलेले आहे. याचे खरे नाव इथल्या शिव या देवतेवरून ठेवलेले होते. ते म्हणजे त्रिभुवनेश्वर! होय हे शिवालय आहे. अंकोर साम्राज्याच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर कुलेन पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे नितांतसुंदर शिवालय. कंबोडियामधील हे एकमेव असे स्थापत्य आहे, जे कुठल्या राजाने बांधलेले नाही, तर राजेंद्रवर्मा दुसरा याचा मंत्री असलेल्या यज्ञवराह याने हे खासगी देवालय उभारले होते. हाच यज्ञवराह पुढे जयवर्मा पाचवा याचा गुरू झाला. राजेंद्रवर्माने आपला मंत्री यज्ञवराह याला सीएम रीप नदीच्या काठावर काही जमीन दान दिली होती. त्याच भूमीवर यज्ञवराहाने हे अतिसुंदर शिवालय उभे केले. यज्ञवराह आणि त्याच्या भावाने या मंदिराची निर्मिती केली. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्यानंतर जेमतेम एकाच वर्षांनी सम्राट राजेंद्रवर्मा दुसरा याचा मृत्यू झाला. या मंदिराच्या परिसरात जी लोकवस्ती होती त्याचे नाव ईश्वरपूर असे होते.

इ. स. 1914 मध्ये फ्रेंचांनी या मंदिराचा शोध घेतला. इथल्या शिल्पांची भुरळ फ्रान्सच्या द गॉल मंत्रिमंडळातील आंद्रे मार्लो या मंत्र्यालासुद्धा पडली होती. त्याने इथल्या 3 अप्सरांच्या मूर्ती लीलया उचलल्या होत्या, परंतु लगेचच तो पकडला गेला आणि त्या मूर्ती पुन्हा होत्या त्याच जागी ठेवण्यात आल्या. पुढे सन 1931 ते 1934 या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. बांते स्राय मंदिरावर केलेले नक्षीकाम आणि शिल्पकाम निव्वळ देखणे आणि कलाकुसरयुक्त आहे. या मंदिरावर विविध स्त्रियांची शिल्पे आणि स्त्री देवतांची शिल्पे असल्याने या मंदिराला स्त्रियांचा महाल, स्त्रियांचे मंदिर असे म्हटले जाऊ लागले. हा परिसर मोठा रमणीय. मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या मार्गावर दुतर्फा जुन्या काही मंदिरांचे सुंदर अवशेष पाहायला मिळतात. छोटेखानी असले तरी खूप सुंदर असे हे मंदिर. जसे ओडिशामधले मुत्तेश्वर मंदिर तसेच हे बांते स्राय मंदिर. इथल्या मंदिरांची खासियत म्हणजे इथे दगडातून कोरलेले खिडक्यांचे गज. जणू काही लेथवर याला आकार दिला असावा इतक्या सफाईने दगडातून हजारो गज एकसारखे केलेले आहेत. या मंदिराचा आकार इतर ख्मेर स्थापत्यासारखा भव्यदिव्य अथवा भलामोठा अजिबात नाही, परंतु सोनार जसे सोन्यात नाजूक कलाकुसर करून अप्रतिम दागिना घडवतो, तसेच हे मंदिर म्हणजे शिल्पिंनी दगडातून कोरून काढलेले सुंदर असे मंदिर आहे.

एकाच्या आत एक अशा तीन प्राकारभिंतींच्या आत हे मंदिर उभे आहे. त्यातल्या बाहेरील भिंती आता नष्ट झाल्या असल्या तरी तिथून आत प्रवेश करण्यासाठी असलेली प्रवेशद्वारे अजूनही उभी आहेत. प्रवेशद्वारावर असलेल्या गोपुरावर केलेले नक्षीकाम देखणे आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या सर्वात बाहेर असलेल्या या गोपुरावर लाल रंगाच्या सँडस्टोन या दगडात कोरलेली तीन तोंडांच्या ऐरावत या हत्तीवर बसलेल्या इंद्राची प्रतिमा बघत राहावी अशी आहे. पूर्व दिशेचा स्वामी असलेला इंद्र मोठय़ा दिमाखात इथे ऐरावतावर विराजमान झालेला दिसतो. हे गोपूर सर्वात उंच असून आतमधील गोपुरे पुढे कमी कमी उंचीची केलेली दिसतात. पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराकडून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी दगडी मार्गावरून जावे लागते. आजूबाजूला प्राचीन मंदिर स्थापत्याचे काही अवशेष इतस्तत विखुरलेले बघायला मिळतात. या मार्गाच्या मध्यावर आपण आलो की, आपल्या दोन्ही बाजूला आपल्याकडे तोंड केलेल्या लांबुळकी दालने दिसतात. त्यांच्या समोर असलेल्या पोर्चेसवर असलेल्या गोपुरावरसुद्धा सुंदर शिल्पकाम केलेले दिसते. आपल्या डाव्या हाताला दिसणाऱ्या गोपुरावर नंदीवर बसलेल्या उमा-महेश्वराची शिल्पं आहेत, तर आपल्या उजव्या हाताला असलेल्या गोपुरावर हिरण्यकशिपूचे पोट फाडणारी नरसिंहाची उग्र मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.

इथून आत समोर दुसरी प्राकारभिंत लागते. इथल्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस भिंतीवर एक मोठा शिलालेख कोरलेला आहे. यापुढे दगडी मार्गावरून आपण शेवटच्या प्राकारभिंतीपाशी पोहोचतो. या ठिकाणी असलेल्या गोपुराला दोन थर आहेत. त्यातून आत गेल्यावर आपल्या समोर एकदम हा सगळा मंदिरसमूह दृष्टीस पडतो. या संपूर्ण मंदिर प्राकारात तत्कालीन ग्रंथालयांचे अवशेषसुद्धा पाहायला मिळतात. आतमध्ये कडेच्या दोन बाजूंना दोन मोठी दालने दिसतात. यावर पूर्वी कौलांचे छप्पर होते. मधोमध एका मोठय़ा आवारात तीन मंदिरे एकाशेजारी एक उभी आहेत. सर्वात मधल्या मंदिराच्या समोर अंतराळ आणि मंडप बांधलेला दिसतो. हेच शिवाचे मुख्य मंदिर. याच्या दक्षिण दिशेला असलेले मंदिरसुद्धा शिवाचेच होते आणि उत्तरेकडील मंदिर हे विष्णूचे होते. तीनही मंदिरे पूर्वाभिमुख असून इतर तीन दिशांना आभासी दरवाजे (blind doors) कोरलेले आहेत. ही मंदिरे एका चौथऱ्यावर एकमेकांना अगदी खेटून असल्यासारखी आहेत. या चौथऱ्यावर चढून जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या असून त्याच्या शेवटी काही रक्षकांच्या मूर्ती दिसतात. आपल्याकडे जसे मंदिराच्या बाहेर द्वारपाल शिल्पांकित केलेले असतात तसेच हे मंदिराचे रक्षक असणार. मात्र इथे या रक्षकांचे धड माणसाचे, तर तोंड मात्र सिंह, माकड, गरुड, यक्ष अशी वेगवेगळी केलेली आहेत. या मूर्ती मात्र मूळ मूर्ती नव्हेत. मूळ मूर्ती नॉम पेन्ह इथल्या संग्रहालयात ठेवल्या आहेत. उत्तर बाजूकडील मंदिरावर गरुडारूढ विष्णूची प्रतिमा कोरलेली दिसते, तर दक्षिणेकडील मंदिरावर सिंहावर आरूढ झालेली देवी म्हणजे ती दुर्गा असावी, हिचे अंकन केलेले दिसते. त्यावरून कदाचित हे दक्षिणेकडील मंदिर दुर्गेचे असावे असाही एक अंदाज करता येतो. या तीनही मंदिरांच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला दोन मोठय़ा ग्रंथालयाचे अवशेष दिसतात.

अतिशय टुमदार असलेला हा सगळा मंदिर परिसर नितांत देखणा आहे. खूप सुंदर ठिकाण बघितल्याचे समाधान हे मंदिर पाहून मिळते. संध्याकाळच्या कलत्या उन्हाच्या वेळी जर इथे आले तर लाल रंगाच्या वालुकाश्म दगडावरील मूर्तिकाम विशेष करून उठून दिसते. अतिशय आकर्षक, टुमदार आणि स्थापत्यशैलीने अत्यंत उन्नत असलेले हे बांते स्राय मंदिर बघून मनाचे समाधान होते हे खरे. एकेक मूर्ती अथवा कथनशिल्पं अनेकदा पाहून, त्याचे अनेक फोटो काढूनसुद्धा मन भरत नाही आणि इथून पाय काही निघत नाही.

Comments are closed.